Friday, November 8, 2013

नेमाडेंची “हिंदु – एक समृद्ध अडगळ”

वाचनाचा बॅकलॉग ही माझ्यासारख्या वाचनप्रेमीसाठी खुप लाजीरवाणी गोष्ट. मी पुस्तक घेऊन तीन वर्षांनंतर नेमाडेंची हिंदु वाचण्याचा दुग्धशर्करा का काय म्हणतात तो योग आला. आणि त्यासाठीसुद्धा मटामधला २७ ऑक्टोबरचा डॉ दिवाणांचा लेख आणि राजन गवससरांच्या एका भाषणातला हिंदुचा उल्लेख अशी योगायोग-आज्ञा घडुन तमाम हिंदुंचा आनंदोत्सव असलेल्या दिवाळसणात हिंदु-वाचनाचा मुहुर्त उजाडला. पण म्हटलं तीस वर्ष खपुन लिहीलेल्या कादंबरीचे आपल्याकडुन तीन वर्षांनंतर का होईना वाचनाचे सत्कार्य घडते आहे हेही नसे थोडके.

मराठी साहित्यात नेमाडे हे फक्त प्रसिद्ध, वाद()ग्रस्त नावच नाही तर लेखक-वाचकांचा एक पंथ आहे. (स्वतः नेमाडेसर हे मान्य करतात.) आता पंथ म्हटल्यावर अनुयायी आणि विरोधक आलेच. आणि या नेमाडपंथीयांच्या बाबतीत तर दोन्ही गट तीव्र भावनावाले.

माझ्यापुरतं सांगायच झाल्यास, मला नेमाडेंच्या कादंबरीचे वाचन म्हणजे नेहमीच एक रोमांचकारी, मनोरंजक अनुभव वाटला. तितकाच आशयगर्भ आणि अस्सल. नोकरीला लागल्यावर केव्हातरी कोसला हाती लागल्यानंतर बिढार-चातुष्ट्य संपेपर्यंत सगळं वाचुन झाल्यावर त्यांनी अजुन का लिहीलं नाही असं सारख वाटत राहीलं. मधे केव्हातरी कळालं की हिंदुचं लिखाण चालुच आहे.

सो बॅक टु हिंदु. खंडेराव नावाच्या खानदेशी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि पेशाने पुरातत्त्वसंशोधक असलेल्या नायकाच्या माध्यमातुन नेमाडेसर हिंदु जीवनपद्धतीची नव्याने व्यापक आणि समग्र मांडणी करु पाहताहेत. इथे फक्त नायकाचे आयुष्यच नव्हे तर मोहेंजदाडो संस्कृतीपासुन, नायकांच्या पूर्वजांपासुन ते गोतावळ्यातील खुप साऱ्या व्यक्तिंच्या आयुष्यातील घटना, संदर्भ, संवाद सहेतुक म्हणा निर्हेतुक म्हणा अशा पद्धतीने दाटीवाटीने पसरल्या आहेत. शेतकऱ्याच्या घरातल्या अडगळीचे रुपक अख्या कादंबरीभर मांडणीमधे, विचारांमधे वगैरे वगैरे आपल्याला परत परत भेटत राहते.

कादंबरीमधे केलेल्या टिका, भाष्ये वगैरेंवर खुप साऱ्या चर्चा नेमाडपंथी अनुयायी आणि विरोधकांच्यात याअगोदरच झालेल्या आहेत त्यामधे मी माझ्या अल्पशा साहित्य-इतिहासादी-ज्ञानाने भर टाकु शकणार नाही. पण कादंबरी वेड्यासारखीवाचुन संपल्यावर माझ्या हिंदुसंस्कारीत मनात जी काही खळबळ उडाली ती शब्दबद्ध करुन शांतता मिळवण्याचा हा प्रयत्न.

आपण हिंदु असण्याचा अर्थ फक्त देवदिकांच्या पुजाअर्चा, सणसमारंभ, चालीरीती, रुढीपरंपरा इतकाच नसतो तर कुटुंबव्यवस्था, गोतावळा, स्त्रीयांची फरपट, त्यांचं संस्कृतितलं स्थान, सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक-नागरी व्यवस्था त्यातला भ्रष्टाचारादी संस्कार असा सगळा परीघपण त्यात येतो. त्यातच एकाबाजुला आपल्यासाठी जीव टाकणारी, नुसत्या आठवणीनेसुद्धा व्याकुळ करणारी गोतावळ्यातली माणसं, बायकांची ओली माया, तर दुसऱ्या बाजुला हेवेदावे, प्रतिष्ठेच्या कल्पना हेपण आहे.कितीही व्यक्तीकेंद्री जगत असलो तरी या पिढीपर्यंतच्या आपल्या बहुतेकांना हा परीघ स्वतःवेगळा करता येणार नाही. कादंबरी वाचताना हि जाणीव गडद होते.

आपल्या पिढीजात परंपरेतुन, गावपांढरीच्या-प्रदेशाच्या इतिहासातुन, पुरातत्त्वातुन जाणिवांचा मागोवा घेउ इच्छीणारा नायक मला जवळचा वाटला. आपण एवढे कोरडे, कृतघ्न होण्यामागे, नात्यांमधला ओलावा संपण्यामागे संस्कृतिचं शहरी-नागरी होत जाणं हे आहे का, नागरी-शहरी होत जाणारी संस्कृती स्वतःचा नाश ओढवुन घेत असते का,अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा कथेच्या ओघात घेतला आहे.

सिंधु संस्कृती, बुद्ध, महानुभाव-वारकरी पंथ, होळकर-पेंढारी-ब्रिटीश आक्रमणं, स्वातंत्र्य, फाळणी, गांधीहत्या, आंबेडकरी नवबौद्ध क्रांती, हरीत क्रांती अशा सगळ्या ऐतिहासिक सांस्कृतिक घडामोडींचा परामर्श नायकाच्या गावावर आणि आजुबाजुच्या लोकांवर होणाऱ्या परीणामाच्या निमित्ताने घेतला आहे. यातल्या बऱ्याच गोष्टींची माहिती नव्हती. त्या घटनांची ऐतिहासिक अचुकता हा भाग थोडावेळ बाजुला ठेवला तरी त्याचा कादंबरीत मांडलेला ग्रामीण जीवनावरचा परीणाम हा बरचं काही शिकवुन जातो. अनेक रुढीपरंपरांची मुळं समजुन घ्यायला मदत करतो.

लहानपणी मला घरातले दुर्लक्षित (किंवा अनटच्ड) कोपरे ढुंढाळायची सवय होती. अडगळीतल्या वस्तु, पुस्तकं कोणाची, का व कधी असे प्रश्न विचारणं हा नकळत माझ्या कौटुंबिक जाणिवा आणि सामान्यज्ञान वाढवण्याचा समृद्ध अनुभव व्हायचा. त्याप्रमाणेचहिंदु – जगण्याची समृद्ध अडगळवाचणे हा माझं मराठी हिंदुत्व वेगळ्या दृष्टीकोणातुन समजुन घेण्याचा अनुभव ठरला.

आता हिंदु-सिरीजमधल्या उर्वरीत तीन कादंबऱ्यांची उत्कंठावर्धक प्रतिक्षा आहे. काहीतरी वेगळं वाचायला मिळणार हे नक्की.

Thursday, November 7, 2013

मनातली शाळा...



मिलींद बोकिल म्हणतात, शाळेतली मजा कशात असते... शाळेत वर्ग, सर, बाकं, पोरंपोरी सगळं असतं... पण आपण त्यात कशातचं नाही. आपण त्या गायीच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्षासारखे मुक्त आहोत. आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग, फळा, भिंती, सर असं काही नसतं. पण त्यातलं शिकणं फार सुंदर.
मला वाटतं थोड्याफार फरकानं सगळीकडे असंचं असतं. कॉलेज, ऑफिस, घर सगळीकडे आपल्या मनात खास एकट्याचंच कॉलेज, ऑफिस किंवा घर असतं. प्रत्येकाचं त्या त्या ठिकाणचं जगणं त्याच्या किंवा तिच्यापुरतं असंचं सुंदर असतं.
सुजय डहाकेचा शाळा हा चित्रपट पाहीन पाहीन म्हणत खुप दिवसांनी बघितला. मिलींद बोकिलांची कादंबरी पूर्वीच वाचली होती आणि खुप आवडलीही होती. इतकी आवडली होती कि नुसत्या बोलण्यापलीकडे जाऊन चारेक मित्रमैत्रिणींना ती कादंबरी वाढदिवसवगैरे निमित्त भेटपणं दिली. त्यावेळी ब्लॉग-फेसबुक-प्रसार व्हायचा होता. नाहीतर... असो.  प्रकाश नारायण संतांच्या वनवास-आदी लंपनत्रयीपाठोपाठ मराठी-मध्यमवर्गीय बालपण बोकिलांच्या शाळेत म्याच्युअर झालं असं मला वाचनाच्या त्या क्रमामुळं खुप वाटायचं. वनवास-बद्दल पुन्हा केव्हातरी लिहीनच.
कॅमेरा, एडीटींग, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या बाबतीत शाळा चित्रपट (जोशीच्या भाषेत) सरस्स. कॅमेराने कादंबरीतला नोस्टॅलजीक बनवणारा काळआणि वातावरण अचुक पकडलयं. जोशी झालेला मुलगा पुस्तकातल्या कॅरेक्टरला एकदम फिट बसलाय. त्याचा चेहरा आणि डोळे खुप काही एक्स्प्रेस करुन जातात. केतकी माटेगावकरचीपण डायलॉग डिलीवरी उत्तमच.
पण दोघांचे प्रसंग बघताना डायलॉग किंवा त्यांचं टायमिंग असं काहीतरी खटकत होतं. स्क्रिप्ट आणि डायलॉग्जवर अजुन काम व्हायला हव होतं. चित्रपट बघताना सांगायचं काहीतरी राहुन गेलं आहे असं सारखं वाटत होतं. कादंबरी आधी वाचल्यामुळे माझ्या अपेक्षापण जरा जास्त होत्या बहुतेक. 
एकदंरीत शाळा चित्रपट एक दृक-अनुभव (विज्युअल एक्स्पीरीयन्स) म्हणुन चांगलाच आहे पण कुठेतरी तो मला माझ्या मनातल्या शाळेत घेउन जाण्यात (कादंबरीच्या तुलनेततरी) कमी पडला असं वाटलं.

झोपेआधीची गोष्ट - Bedtime story


प्रसंग इवलासा पण माझ्या सुटी-सुख-आधीन मनाच्या डोहात डुबुक झालं म्हणुन ह्या शेअर करण्यासारख्या चार ओळी.
आज माझ्या मुलासाठी - तीन वर्षांच्या विराजसाठी त्याच्या आत्त्याने धनुष्यबाण आणला. झोपेपर्यंत त्याने तो धनुष्य काही हातातुन खाली ठेवला नाही. झोपवायच्या वेळी बायकोने कष्टाने धनुष्यबाण दूर केला आणि नेहमीप्रमाणे विराजने स्टोरीची फर्माईश केली. बायकोने नेमकी एकलव्याची स्टोरी सांगायला सुरुवात केली. गुरुदक्षिणेच्या प्रसंगापर्यंत आल्यावर बायकोने मला प्रश्न केला, आता त्याला कसं सांगायचं रे. मी लॅपटॉपमधुन डोक वर काढुन म्हटलं, सांग की, जे आहे ते सांगायचं. तसंही त्याला आता काही कळणार नाही.
मग मला नेहमीप्रमाणे प्रश्न पडायला लागले. बायकोला हीच स्टोरी सांगावी असं का वाटलं असेल? आणि त्यानंतर ती गुरुदक्षिणेच्या सीनला का अडखळली असेल?
मग माझी विचारांची टकळी सुरु झाली. एकलव्यच का. धनुष्यबाण वापरणारे अर्जुन, राम असे मोठे योद्धे असताना एकलव्यच का. तिला विचारल्यावर ती म्हणाली, माहीत नाही. काही सांगता येत नाही. आणि मी जाणुनबुजुन केलं असही नाही. आणि तु फार किस पाडत बसु नको.
तरीपण मी असा निष्कर्ष काढला कि मराठी उच्च मध्यमवर्गीयांना एकलव्य जास्त लक्षात राहतो तो कदाचित त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे. म्हणजे या वर्गाला अन्यायाची चिड आहे हे नक्की. तो दूर करण्यासाठी हा वर्ग काय योगदान देतो हा विषय वेगळाच आहे.
त्यानंतर बायको गुरुदक्षिणेच्या सीनला का अडखळली. कदाचित तिला वाटलं असेल की आपल्या मुलाला आत्ताच अन्यायासारख्या (भिषण?) प्रकारांची ओळख करुन द्यायला नको. म्हणजे जगात सगळे लोक नेहमी न्यायानेच वागतात हे रम्य चित्र या रम्य बालपणाततरी त्याच्या कोवळया मनावर उमटु दे. फेअर ईनफ. एका आईची अशी अपेक्षा रास्त आहे.
शेवटी हा एकलव्य कुठुन आला. तर महाभारतातुन. आपला एक महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा. रा. वा. शेवडेगुरुजी नावाचे एक लेखक म्हणाले होते - रामायण हे आदर्श जीवन कसं असावं हे सांगत तर महाभारत हे वास्तव जीवन कसं असतं ते (शब्द हेच आणि त्यांचेच का याबद्दल चु.भु.दे.घे.). त्याअर्थाने महाभारतातल ते वास्तव जीवन अजुन बदललयं (किमान एकलव्याच्या कथेपुरतं तरी) असं वाटत नाही. म्हणुन व्यासमुनी ग्रेट.

Friday, September 20, 2013

जोगवा, अंधश्रद्धा, दाभोळकर आणि निर्धार परीषद

काल बऱ्याच दिवसांनी जोगवा पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. उपेंद्र लिमये खरचं तो भुमिका जगलायं असं वाटलं. मुक्ता आजची आघाडीची अभिनेत्री का आहे  हेही प्रकर्षाने जाणवलं. चित्रपटाला तीन साहित्यकृतींची सशक्त पार्श्र्वभूमी लाभल्यामुळे कथा आणि संवाद प्रभावी झाले आहेत. चित्रीकरण, संगीत आणि सहकलाकारांचे अभिनय तितकेच उजवे. पण दुसर्या बाजुला लांबी आटोपशीर असल्यामुळे मात्र काही ठिकाणी प्रसंग पटापट उरकल्यासारखे वाटतात आणि सगळ्यांच्या साड्या जरा मळवुन वापरल्या असत्या तर अजुन वास्तववादी फिल आला असता.

राजन गवस सरांचं चित्रपटातील अल्पसं दर्शन सुखावह आणि त्यांच्या याविषयीच्या भूमिकेला न्याय देणारं वाटलं.

जोगवाचा शेवट मात्र काहीसा झटपट गुंडाळल्यासारखा वाटला. जोगत्याच्या पुनर्विवाहासारख्या तत्कालिन समाज-विरोधासाठी प्रत्यक्षात भोगावे लागणारे परीणाम दाखवले असते तर अंधश्रद्धेचा जनमानसावरचा पगडा अजुन अधोरेखित करता आला असता.

सध्या कदाचित देवदासी आणि जोगतिणींचा प्रश्र्न तितका भयानक राहीला नसावा. पण वेगवेगळ्या मार्गाने अंधश्रद्धा समाजात पुन्हा डोके वर काढताहेत असं वाटतयं. त्यांचं स्वरुप जोगवासारख्या कर्मकांडांइतकं भयानक राहीलं नसेल कदाचित. पण ग्रह-तारे, नशीब आणि गुरु-साधु-बुवांचा वाढता प्रभाव, जातपंचायतींची दहशत, उत्सवांच्या दरम्यान वर्गणी, प्रदुषण, कोंडी यांमुळे वेठीस धरले जाणे इत्यादी प्रकारांनी व्यक्ती किंवा समाजाचं होणारं शोषण थांबलं आहे असं वाटत नाही.
याच पार्श्र्वभूमीवर कोल्हापूरात ऐन गणपतीच्या दिवसात पार पडलेली निर्धार परीषद आठवली. एन. डी. पाटील, कॉम्रेड पानसरे आणि निखिल वागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड समुदायाने एकत्र येऊन दाभोळकरांच्या हत्त्येचा निषेध नोंदवला. गंमत म्हणजे कोणत्याच प्रमुख वर्तमानपत्रांना ही महत्त्वाची बातमी वाटली नाही. नको-नको त्या पुरस्कार सोहळ्यांचे फोटो छापुन येतात पण असल्या समाजोपयोगी कार्यक्रमाची दखल माध्यमांनी घेतली नाही हे पाहुन वाईट वाटले.
एन. डी. सरांनी नमुद केल्याप्रमाणे सगळ्याच समाजाने अंतर्मुख होऊन आपले आचार-विचार बदलण्याची गरज आहे. समग्रपणे वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे एकवेळ अवघड असेल कदाचित पण कर्तृत्त्वावर विश्र्वास ठेवणे आणि आपल्या श्रद्धां इतरांवर न लादता इतरांच्या मताचा आदर करणे हे तर सहज शक्य आहे. म्हणुनच दाभोळकरांसारख्यांचा लढा हा कोणत्याही श्रद्धेविरुद्ध नसुन शोषणाविरुद्ध आहे हे त्यांच्या साहित्याच्या वाचनातुन प्रकर्षाने जाणवलं.

मला नेहमी प्रश्न पडायचा कि माझ्यासारखे कोणत्याही चळवळीत किंवा समाजकार्यात भाग न घेणारे लोक याबाबतीत काय करु शकतील? मी याकामी काय योगदान देऊ शकेन? आता काही विचारांती असं जाणवतं की:
  • आपण शोषणाच्या विरोधी भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या श्रद्धा आचरणात आणताना घरातले बाहेरचे कोणालाही त्रास होता कामा नये किंवा इतरांमुळे असा त्रास होत असेल ठामपणे निषेध नोंदवला पाहिजे.  
  •  नशीबापेक्षा कर्तृत्वाने मिळालेल्या यशाला अधिक गौरवलं पाहिजे. समाजाचा कर्तृत्वावरचा विश्वास वाढेल तेव्हाच या अंधश्रद्धेच्या कुबड्या गळुन पडतील.

Wednesday, September 4, 2013

माझं डोकं फिरवणारे सुपरहीट (विडंबन) चित्रपट

चहा पिता पिता आमचे परम्मित्र गुर्जी म्हणाले "दुनियादारी"नं २२ कोटीचा बिजनेस केला, पिक्चर सुपरहिट झाला. माझी तीन दिवस जुनी जखम भळभळ वाहायला लागली. म्हणजे माझं संजय जाधव किेवा स्वप्नील जोशीबरोबर काही वाकडं  नाही. पण दुनियादारी कादंबरीची लागलेली वाट मला बघवली नाही. कारण मी आधी पुस्तकांचा फॅन आहे मग पिक्चर्सचा. तीच भावना माझी "३ इडीयट्स" बद्दल आहे. "फाईव पॉइंट समवन" ची पार वाट लावली हिरानी आणि कंपनीने.

मान्य आहे कि पुस्तक न वाचलेल्या प्रेक्षकांना ते सगळं छानच वाटणार पण मग प्रोफेशनल कर्टसी नावाचा काही प्रकार आहे की नाही. पूर्वी कवितांचे विडंबन छापताना मूळ लेखकाची क्षमा मागुन असं म्हणायची पद्धत होती तसं म्हटल असतं तरी चाललं असतं. पण ते म्हणणं दूर हिरानीसाहेबांनी तर दोन्ही कानावर हातच ठेवले.

ताजमहालसारखं मटेरीअल मिळाल्यावर त्याचा रंगीबेरंगी मॉल बनवायचा अट्टाहास का. भले आजकाल लोकांना मॉलच जास्त आवडतो पण त्यासाठी ताजमहालाचं नाव का खराब करायचं.

माझं डोकं फिरवणार्या  ह्या दोन्ही सुपरहीट्समधे खुप साम्यं आहेत.
- दोन्ही पिक्चर्स पुस्तकांच्या कथांना फाट्यावर मारतात हे आधी सांगितलेच आहे.
- दोन्ही पिक्चर्समधे नायकांची पात्र लार्जर दॅन लाईफ केली आहेत. जेव्हा की पुस्तकात ती पात्रं सामान्य आहेत.
- दोन्ही पिक्चर्समधे अतार्कीक (इल्लॉजिकल) घटना घुसडुन प्रेक्षकानुनय (प्रेक्षकांचे लांगुलचालन) केले आहे.

त्यातल्या त्यात जास्त खटकणारी बाब म्हणजे तो नायक सदगुणांचा पुतळा दाखवणं. छोटा भीम किंवा रामायण मधेच ते शोभुन दिसतं.

पण आम्हा भारतीयांना सगळीकडे सर्वगुणसंपन्न रामचं बघायचा असतो. कारण आम्हाला समाज सुधारायची जबाबदारी अशी कोणीतरी एकट्यानचं घेतलेली बघायची आहे. आम्ही आपले सामान्य लोक, आम्ही फक्त अशा राम टाइप नायकांसाठी टाळ्या वाजवणार. पिक्चर संपल्यावर ट्रॅफिकमधे सिग्नल मोडायला मग आम्ही मोकळे.

गुर्जी म्हणाले सगळ्या जगाला जे आवडतं तेच तुम्हाला नाही आवडत. तुम्ही पूर्वग्रहदुषित नजरेनं पिक्चर बघता. असेल कदाचित पण मग सगळ्यात शेवटी मला मनापासुन एवढंच वाटतं कि प्रेक्षकांना प्रगल्भ चित्रपट दाखवुन त्यांची अभिरुची संपन्न करण्याऐवजी त्यांना ठराविक साच्यातल्या मनोरंजनाचं व्यसन लावणं हे आपल्या समाजाच्या एकंदर प्रगतीसाठी खुप धोकादायक आहे.