Wednesday, September 4, 2013

माझं डोकं फिरवणारे सुपरहीट (विडंबन) चित्रपट

चहा पिता पिता आमचे परम्मित्र गुर्जी म्हणाले "दुनियादारी"नं २२ कोटीचा बिजनेस केला, पिक्चर सुपरहिट झाला. माझी तीन दिवस जुनी जखम भळभळ वाहायला लागली. म्हणजे माझं संजय जाधव किेवा स्वप्नील जोशीबरोबर काही वाकडं  नाही. पण दुनियादारी कादंबरीची लागलेली वाट मला बघवली नाही. कारण मी आधी पुस्तकांचा फॅन आहे मग पिक्चर्सचा. तीच भावना माझी "३ इडीयट्स" बद्दल आहे. "फाईव पॉइंट समवन" ची पार वाट लावली हिरानी आणि कंपनीने.

मान्य आहे कि पुस्तक न वाचलेल्या प्रेक्षकांना ते सगळं छानच वाटणार पण मग प्रोफेशनल कर्टसी नावाचा काही प्रकार आहे की नाही. पूर्वी कवितांचे विडंबन छापताना मूळ लेखकाची क्षमा मागुन असं म्हणायची पद्धत होती तसं म्हटल असतं तरी चाललं असतं. पण ते म्हणणं दूर हिरानीसाहेबांनी तर दोन्ही कानावर हातच ठेवले.

ताजमहालसारखं मटेरीअल मिळाल्यावर त्याचा रंगीबेरंगी मॉल बनवायचा अट्टाहास का. भले आजकाल लोकांना मॉलच जास्त आवडतो पण त्यासाठी ताजमहालाचं नाव का खराब करायचं.

माझं डोकं फिरवणार्या  ह्या दोन्ही सुपरहीट्समधे खुप साम्यं आहेत.
- दोन्ही पिक्चर्स पुस्तकांच्या कथांना फाट्यावर मारतात हे आधी सांगितलेच आहे.
- दोन्ही पिक्चर्समधे नायकांची पात्र लार्जर दॅन लाईफ केली आहेत. जेव्हा की पुस्तकात ती पात्रं सामान्य आहेत.
- दोन्ही पिक्चर्समधे अतार्कीक (इल्लॉजिकल) घटना घुसडुन प्रेक्षकानुनय (प्रेक्षकांचे लांगुलचालन) केले आहे.

त्यातल्या त्यात जास्त खटकणारी बाब म्हणजे तो नायक सदगुणांचा पुतळा दाखवणं. छोटा भीम किंवा रामायण मधेच ते शोभुन दिसतं.

पण आम्हा भारतीयांना सगळीकडे सर्वगुणसंपन्न रामचं बघायचा असतो. कारण आम्हाला समाज सुधारायची जबाबदारी अशी कोणीतरी एकट्यानचं घेतलेली बघायची आहे. आम्ही आपले सामान्य लोक, आम्ही फक्त अशा राम टाइप नायकांसाठी टाळ्या वाजवणार. पिक्चर संपल्यावर ट्रॅफिकमधे सिग्नल मोडायला मग आम्ही मोकळे.

गुर्जी म्हणाले सगळ्या जगाला जे आवडतं तेच तुम्हाला नाही आवडत. तुम्ही पूर्वग्रहदुषित नजरेनं पिक्चर बघता. असेल कदाचित पण मग सगळ्यात शेवटी मला मनापासुन एवढंच वाटतं कि प्रेक्षकांना प्रगल्भ चित्रपट दाखवुन त्यांची अभिरुची संपन्न करण्याऐवजी त्यांना ठराविक साच्यातल्या मनोरंजनाचं व्यसन लावणं हे आपल्या समाजाच्या एकंदर प्रगतीसाठी खुप धोकादायक आहे. 

No comments: