Thursday, February 20, 2014

व्हर्च्युअल प्रेमाचा कळस – (Her)

एक माणुस अयशस्वी लग्नामुळे एकटा पडलेला असतो आणि मग तो सॉफ्टवेअरच्या प्रेमात पडतो. ही एक लाईनची कथा ऐकायला साधी वाटते. तुम्ही म्हणणार, त्यात काय विशेष. स्मार्टफोन, गेम्स वगैरेमुळे पागल झालेले अनेक लोक आम्ही बघितलेत.पण तेच सॉफ्टवअर जर माणसांसारखं भावनिक वागायला लागलं आणि प्रेमाला योग्य तो प्रतिसाद द्यायला लागलं तर???

अशा अशक्यप्राय नात्याचा वेध घेणारा हर (Her) नावाचा चित्रपट नुकताच बघितला.

भविष्यकालात जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफीशिअल इंटेलिजेन्स) असणारे अतिप्रगत सॉफ्टवेअर माणसाने तयार केले असतील तेव्हाच्या काळात घडणारी ही गोष्ट. ऑपरेटींग सिस्टीम सॉफ्टवेअर माणसाच्या भौतिक गरजा भागवण्याबरोबरच मानसिक आणि भावनिक गरजा भागवायला लागेल तेव्हा काय घडेल याची एक शक्यता या चित्रपटात बघायला मिळते.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की पडद्यावरचं सगळं इतक्या सहजपणे उलगडत जातं कि असं कुठे असतं का?” हे म्हणायचंचं आपण विसरुन जातो आणि घडतं ते एंजॉय करतो.

स्पाईक जोन्झ नावाच्या कथाकार, दिग्दर्शकाने या आगळ्यावेगळ्या नातेसंबंधावरची ही कथा हळुवारपणे आणि सौंदर्यपूर्णतेने पेश केली आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आभासी भविष्याची एक सुंदर, रंगीबेरंगी पण कारुण्यपूर्ण झलक आहे.  चित्रपटातलं संगीतपण नातेसंबंधातले पदर उलगडताना तितक्याच हळुवारपणे झिरपतं.

जॉक्विन फिनिक्स नावाच्या नटाने भावनिक पण तितकाच साधा पत्रलेखक नायक चांगला रंगवला आहे. ऑपरेटींग सिस्टीमचा आवाज बनुन फक्त ऐकु येणाऱ्या स्कार्लेट जोहान्सन या नटीनं नात्यातल्या सुरुवातीच्या उत्सुकतेपासुन ते उत्कटतेपर्यंतचे सर्व भाव प्रभावीपणे पोचवले आहेत. इतर पात्रांचा वावर पण नेटका आणि सहज.

ऑपरेटींग सिस्टीम बरोबरच्या प्रेमामुळे खऱ्या मानवी नात्यांमधे निर्माण झालेले तणावसुद्धा हाताळायला दिग्दर्शक विसरत नाही. एकिकडे नातेसंबंधांत सर्वसाधारणपणे अयशस्वी ठरणाऱ्या सामान्य मानवी मनाचा पराभव तर अशा शक्यतांना जन्म घालु शकणाऱ्या अचाट मानवी बुद्धीचा पराक्रम अशी जुगलबंदी दिसुन येते. अतिंद्रीय पातळीवर सुरु झालेली प्रेमकथा जेव्हा अतिबौद्धिक पातळीवर जाऊन संपते तेव्हा अनेक कल्पनातीत शक्यतांची वर्तुळं मनात उमटत राहतात.

शेवटी का कुणास ठाऊक पण मला पाडगावकर आठवले आणि (त्यांची माफी मागुन) त्यांची ही कविता थोडी बदलुन अशी गुणगुणावीशी वाटली:
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं...
व्हर्चुअल का असेना पण सेम असतं...
सॉफ्टवेअर साठी प्रथम ते एक चॅलेंज असतं...
रुसवे फुगवे हुरहुर तगमग सारं माणसांसारखचं घडतं...
पण सॉफ्टवेअरला जेव्हा ते प्रेम खरचं जमतं...
तेव्हा माणसांचं काही खरं नसतं...

Tuesday, February 18, 2014

फॅन्टास्टीक फॅन्ड्री


फॅन्ड्री हा चित्रपट पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता. भावुक पण तितकीच दाहक कथा, एकिकडे गावाकडचे मोकळे शिवार आणि दुसरीकडे बंदिस्त गावगाडा टिपणारा अप्रतिम कॅमेरा, कमीत कमी शब्दांत पण योग्य ते भाव देहबोलीतुन पोचवणारा कलाकारांचा अभिनय आणि या सगळ्यांवर नागराज मंजुळेंची दिग्दर्शकीय पकड या सगळ्या गोष्टी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात आणि जागतिक दर्जा मिळवुन देतात. नागराजने स्वतः रंगवलेले चंक्या नावाचे पात्र त्यांच्या बहुगुणी कर्तृत्त्वाची सार्थ ओळख करुन देते.

मराठी चित्रपटांच्या सरकारपुरस्कृत भाऊगर्दीत असा बावनकशी जागतिक दर्जाचा चित्रपट पाहायला मिळेल अशी आशा मी अलीकडं सोडुन दिली होती. पण नागराज मंजुळेंनी अनपेक्षित धक्का दिला. फॅन्ड्रीचं समिक्षकांनी चौफेर कौतुक केलं आणि मराठी रसिकांनीपण पहिल्या तीन दिवसात दिड कोटींचं माप त्याच्या पदरात टाकलं.

प्रोमोजमुळे टाईमपास सारखा पौगंडावस्थेतील प्रेमकथा वाटणारा हा चित्रपट पात्रांच्या अंतरंगात शिरत, गावातल्या सामाजिक घडामोडी टिपत शेवटाला पोचला तेव्हा चित्रपटांवर आणि माणुसपणाच्या गोष्टींवर प्रेम करणारा माझ्यातला प्रेक्षक नागराज मंजुळे नावाच्या रसायनाच्या प्रेमातच पडला.  

बऱ्याच प्रेक्षकांची अवस्था जे समोर दिसतंय तेव्हढंच ते नाही हे जाणवतं, पण काय ते कळत नाही. अन्याय, अत्याचार असेल असं वाटलं. पण तसं काहीच नाही. फक्त पिक्चर संपल्यावर पुढे काय झालं असेल या विचाराने छळ होत राहतो (मायबोली.कॉम वरुन) अशी झाली.

मला वाटतं नागराजला या कथेत अन्याय, अत्याचार असा मेलोड्रामा दाखवायचा नाहीये. त्याच्या कथेतला तो ग्रामिण समाज उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधण्याइतका प्रगत तर आहेच पण तितकाच सावध आणि संतुलितपण आहे. मग ती पाटलाची प्रतिक्रीया असो किंवा गुरुजींचं शाळेतलं वागणं. म्हणुनच चित्रपटातला कचरु माने (किशोर कदम) गावातल्या लोकांशी सलोख्याचे संबंध राखत सगळं सहन करु शकतो. पण त्याचवेळी जातिपातीवरुन हेटाळणी करणारे संग्राम पाटील आणि त्याच्या मित्रांसारखे काही समाजघटक एखाद्या जब्याचे भावविश्व उद्ध्वस्त करतात. आणि अशा वेळी आजुबाजुचा समाज फक्त बघ्याची भुमिकाच घेतो.
आपल्या आसपास सहज घडु शकणाऱ्या या गोष्टीतलं दुर्मिळ सौंदर्य टिपण्याची शब्दातीत किमया नागराज मंजुळे आणि त्याच्या टिमला जमुन गेली आहे हे नक्की.