Thursday, May 3, 2007

फ्रेंच चित्रपट "The ax" ("Le couperet")

एक माणूस आपल्या गाडीतून एकाला उडवून आणि चाकाखाली चिरडून खून करतो. हॊटेल रूममध्ये येऊन जबरदस्त अस्वस्थ मनस्थितीत अंघोळ करतो आणि स्वतः:चा कबुलीजबाब ध्वनिमुद्रित करायला लागतो. या कबुलीजबाबामधून कथेचा पहिला भाग उलगडत जातो. तो एक कागद उद्योगातला उच्चपदस्थ व्यावसायिक होता. त्याला काही दिवसापूर्वीच त्याच्या कंपनीने खर्चकपात (cost cutting), एकीकरण (merger) अशी कारणे दाखवून पंधरा महिन्यांचा पगार देऊन काढून टाकलेले असते (lay off). सुरुवातीला त्याला असा विश्वास असतो की आपल्याला लगेच दुसरे काम मिळेल. पण सुमारे अडीच वर्ष प्रयत्न करूनसुद्धा काम न मिळाल्याने त्याचा धीर सुटायला लागतो. आणि अशा मनस्थितीत त्याच्या डोक्यात एक भयंकर कल्पना येते. इच्छीत पद प्राप्त करण्यासाठी त्याच्यापेक्षा लायक पाच-सहा उमेदवारांचा काटा काढून, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा खून करून स्पर्धा कमी करायची. तर हा चित्रपट आहे त्याच्या या कामगिरीचे खिळवून ठेवणारे चित्रण. दुसऱ्या खुनानंतर त्याला अपराधी वाटून चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेला कबुलीजबाब ध्वनिमुद्रित करतो. पण नंतर तो त्या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडतो व बाकी सर्व खुनांचा बेतसुद्धा अमलात आणतो. तर अशी ही भन्नाट कथा. यामध्ये एक छोटंसं उपकथानक पण आहे, त्याच्या मुलाच्या चोरीचं. तसेच पोलीस त्याला त्याच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या खुनाची माहिती एक संबंधित म्हणून द्यायला येतात तेव्हा आपली एक संशयित म्हणून चौकशी करायला आले असतील असे वाटून त्याची भंबेरी उडते. घरातल्या सर्व सदस्यांपासून लपवून योजना अमलांत आणताना झालेली त्याची तारेवरची कसरत, या सर्व प्रकारांमध्ये उडालेली धांदल, पण निवडलेल्या मार्गाबद्दल असलेला त्याचा ठामपणा या सर्वांचा एक जबरदस्त वेगवान कोलाज म्हणजे हा थरारपट.
हा चित्रपट डोनाल्ड वेस्टलेक नावाच्या अमेरिकन लेखकाच्या "The ax" या कादंबरीवर आधारीत आहे. मुळात रहस्यकथा या स्वरूपात लिहिलेल्या कादंबरीला कोस्टा गावरास या फ्रेंच दिग्दर्शकाने ब्लॅक कॊमेडी या स्वरूपात पेश करून भांडवलशाहीच्या नफेबाजीच्या अमानुष वाटचालीवर एक जळजळीत सामाजिक व राजकीय भाष्य केले आहे.
नायक झालेल्या जोस गार्सिया या कलाकाराने भूमिका अगदी समरसुन निभावली आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही आणि नक्कीच विचार करायला लावतो.

Wednesday, May 2, 2007

गो. नी. दाण्डेकरांच्या "कहाणीमागची कहाणी"

"कहाणीमागची कहाणी" या पुस्तकांत गो. नी. दाण्डेकरांनी (गोनीदा) आपल्या लेखनाबद्दल, निर्मितीप्रक्रियेबद्दल वेळोवेळी लिहीलेले लेख आहेत. तसेच त्यांनी वाचकांच्या पत्रानां दिलेली उत्तरे व त्यांची "मॅजेस्टीक गप्पा" या कार्यक्रमांतर्गत घेतलेली मुलाखत या पुस्तकामधे आहे.
गोनीदांच पहिलं पुस्तक कोणतं वाचलं ते आता आठवत नाही (कदाचित "माचीवरला बुधा" किंवा "जैत रे जैत" असावं.) तेव्हापासुन गोनीदा आवडते लेखक झाले. भोवतालच्या निसर्गाचे सहज आणि सोपे वर्णन करीत वाचकाला गोष्ट सांगण्याची त्यांची शैली पहिल्यापासून आवडली. त्यावेळी लागोपाठ त्यांच्या "माचीवरला बुधा", "जैत रे जैत", "मृण्मयी", "शितु", "स्मरणगाथा" व अगदी अलिकडे "रानभुली" या पुस्तकांचे वाचन झाले.
गोनीदांचा संत साहित्याचा प्रदीर्घ अभ्यास, संत गाडगेबाबांचा सहवास, नर्मदा परिक्रमा इत्यादींनी परिपुर्ण असलेले विलक्षण जीवन यामुळे गोनीदांच्या लिखाणाला एक अध्यात्मिक खोली प्राप्त झाली आहे. याचा पुरेपुर अनुभव "मृण्मयी", "माचीवरला बुधा" वाचताना येतो. मानवी संबंधाबद्दलची एक प्रगल्भ जाणीव त्यांच्या पात्रांमधुन उठुन दिसते.
तसेच निसर्गावरील अनुभवसिद्ध प्रेमामुळे त्यांच्या कादंबऱ्यामध्ये डोकावणारा निसर्ग नुसताच पार्श्वभुमीपुरता मर्यादित न राहता तो कादंबरीतील पात्राचीही भुमिका निभावतो. "अनुभवसिद्ध" अशासाठी म्हटले कारण गोनीदांनी आपल्या कादंबऱ्यामधील वातावरण हुबेहुब यावे यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वास्तव्य केले व पात्रांचे राहणे स्वत: जगुन मग लिहीले.
तर गोनीदांच्या लेखनातील या व यासारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांची चिकित्सा "कहाणीमागची कहाणी" मधे आहे आणि हे सर्व त्यांच्याच शब्दांत वाचल्यामुळे त्यांची पुस्तके पुन्हा वाचण्याची इच्छा झाली आहे हे निश्चितचं. Visit blogadda.com to discover Indian blogs

सात सक्कं त्रेचाळीस, किरण नगरकर

१९७४ नंतर थेट २००४ मध्ये दुसरी आवृत्ती निघालेली ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दुर्लक्षित राहिली. कठोर समिक्षेमुळे तिला मराठीत जनाधार लाभला नाही व तिची घोर उपेक्षा झाली. आणि मोठा विरोधाभास असा की ह्याच कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीला काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले. हे सर्व विद्युत भागवत यांच्या प्रस्तावनेत नमुद करण्यात आले आहे. (ता.क. अलिकडेच किरण नगरकर यांच्या "ककल्ड" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.)
तर ही कथा आहे, "कुशंक पुरंदरे" नावाच्या युवकाची.
कादंबरीत फ़्लॅशबॅक आणि जंपकट्स तंत्रांचा वापर आहे.
सुसुत्रता नसलेली, मानवी जीवनाची निरर्थकता-असंबंद्धता दर्शविणारी, स्त्री-पुरुष संबंधांची अनेक गुंतागुंतीची रुपे दाखविणारी, महानगरीय अस्तित्ववादी-शुन्यवादी जीवन चितारणारी अशी अनेक वैशिष्ट्ये या कादंबरीच्या वर्णनार्थ वेगवेगळ्या समीक्षणात आली आहेत.
पण कादंबरी एकदम भन्नाट वाटली. वाचताना "कोसला" ची आठवण झाली. यातील "कुशंक"बरोबरचं "तु" आणि "रघु" ही पात्रं विशेष आवडली. "आरोती" बरोबरचे प्रसंग आणि त्यांचे संवादसुद्धा आवडले. भाऊ पाध्यांनी म्हटल्याप्रमाणे या कादंबरीने नक्कीच मस्तक गरगरवुन टाकलं.

मिलिन्द बोकिल यांचा कथासंग्रह "उदकाचिया आर्ती"

प्रामुख्याने कार्यकर्त्या व्यक्ती, त्यांचे कार्य, आजुबाजुच्या व्यक्तींशी आलेले त्यांचे संबंध तसेच व्यक्तिगत ताणतणाव यांचे वेगवेगळे रंग या कथांमधुन आले आहेत. (अपवाद: कथा "विदेश" आणि "दुपार" यामध्ये कार्यकर्त्या व्यक्ती नाहीत.)
सर्वच कथांमधुन भावभावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजचे सामाजिक वास्तव प्रखरपणे कधी पार्श्वभुमीच्या रुपाने तर कधी मुळ आशयामध्ये सर्वच कथांमधे आढळते.
"भूमी" वगळता सर्वच कथांना स्त्री-पुरुष संबंधाचे परिमाण आहे.
मानवी मनोव्यापाराचे वेध घेणाऱ्या ह्या कथा तत्कालिन सामाजिक वास्तवाच्या संदर्भामुळे अगदी खऱ्या वाटतात व नक्कीच वाचनीय आहेत.
"चक्रव्युह" ही कथा त्यातल्या क्लायमॅक्समुळे आणि "भावी इतिहास" त्यातल्या नायकाच्या चित्रणामुळे विशेष आवडल्या.