Thursday, February 20, 2014

व्हर्च्युअल प्रेमाचा कळस – (Her)

एक माणुस अयशस्वी लग्नामुळे एकटा पडलेला असतो आणि मग तो सॉफ्टवेअरच्या प्रेमात पडतो. ही एक लाईनची कथा ऐकायला साधी वाटते. तुम्ही म्हणणार, त्यात काय विशेष. स्मार्टफोन, गेम्स वगैरेमुळे पागल झालेले अनेक लोक आम्ही बघितलेत.पण तेच सॉफ्टवअर जर माणसांसारखं भावनिक वागायला लागलं आणि प्रेमाला योग्य तो प्रतिसाद द्यायला लागलं तर???

अशा अशक्यप्राय नात्याचा वेध घेणारा हर (Her) नावाचा चित्रपट नुकताच बघितला.

भविष्यकालात जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफीशिअल इंटेलिजेन्स) असणारे अतिप्रगत सॉफ्टवेअर माणसाने तयार केले असतील तेव्हाच्या काळात घडणारी ही गोष्ट. ऑपरेटींग सिस्टीम सॉफ्टवेअर माणसाच्या भौतिक गरजा भागवण्याबरोबरच मानसिक आणि भावनिक गरजा भागवायला लागेल तेव्हा काय घडेल याची एक शक्यता या चित्रपटात बघायला मिळते.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की पडद्यावरचं सगळं इतक्या सहजपणे उलगडत जातं कि असं कुठे असतं का?” हे म्हणायचंचं आपण विसरुन जातो आणि घडतं ते एंजॉय करतो.

स्पाईक जोन्झ नावाच्या कथाकार, दिग्दर्शकाने या आगळ्यावेगळ्या नातेसंबंधावरची ही कथा हळुवारपणे आणि सौंदर्यपूर्णतेने पेश केली आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आभासी भविष्याची एक सुंदर, रंगीबेरंगी पण कारुण्यपूर्ण झलक आहे.  चित्रपटातलं संगीतपण नातेसंबंधातले पदर उलगडताना तितक्याच हळुवारपणे झिरपतं.

जॉक्विन फिनिक्स नावाच्या नटाने भावनिक पण तितकाच साधा पत्रलेखक नायक चांगला रंगवला आहे. ऑपरेटींग सिस्टीमचा आवाज बनुन फक्त ऐकु येणाऱ्या स्कार्लेट जोहान्सन या नटीनं नात्यातल्या सुरुवातीच्या उत्सुकतेपासुन ते उत्कटतेपर्यंतचे सर्व भाव प्रभावीपणे पोचवले आहेत. इतर पात्रांचा वावर पण नेटका आणि सहज.

ऑपरेटींग सिस्टीम बरोबरच्या प्रेमामुळे खऱ्या मानवी नात्यांमधे निर्माण झालेले तणावसुद्धा हाताळायला दिग्दर्शक विसरत नाही. एकिकडे नातेसंबंधांत सर्वसाधारणपणे अयशस्वी ठरणाऱ्या सामान्य मानवी मनाचा पराभव तर अशा शक्यतांना जन्म घालु शकणाऱ्या अचाट मानवी बुद्धीचा पराक्रम अशी जुगलबंदी दिसुन येते. अतिंद्रीय पातळीवर सुरु झालेली प्रेमकथा जेव्हा अतिबौद्धिक पातळीवर जाऊन संपते तेव्हा अनेक कल्पनातीत शक्यतांची वर्तुळं मनात उमटत राहतात.

शेवटी का कुणास ठाऊक पण मला पाडगावकर आठवले आणि (त्यांची माफी मागुन) त्यांची ही कविता थोडी बदलुन अशी गुणगुणावीशी वाटली:
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं...
व्हर्चुअल का असेना पण सेम असतं...
सॉफ्टवेअर साठी प्रथम ते एक चॅलेंज असतं...
रुसवे फुगवे हुरहुर तगमग सारं माणसांसारखचं घडतं...
पण सॉफ्टवेअरला जेव्हा ते प्रेम खरचं जमतं...
तेव्हा माणसांचं काही खरं नसतं...

Tuesday, February 18, 2014

फॅन्टास्टीक फॅन्ड्री


फॅन्ड्री हा चित्रपट पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता. भावुक पण तितकीच दाहक कथा, एकिकडे गावाकडचे मोकळे शिवार आणि दुसरीकडे बंदिस्त गावगाडा टिपणारा अप्रतिम कॅमेरा, कमीत कमी शब्दांत पण योग्य ते भाव देहबोलीतुन पोचवणारा कलाकारांचा अभिनय आणि या सगळ्यांवर नागराज मंजुळेंची दिग्दर्शकीय पकड या सगळ्या गोष्टी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात आणि जागतिक दर्जा मिळवुन देतात. नागराजने स्वतः रंगवलेले चंक्या नावाचे पात्र त्यांच्या बहुगुणी कर्तृत्त्वाची सार्थ ओळख करुन देते.

मराठी चित्रपटांच्या सरकारपुरस्कृत भाऊगर्दीत असा बावनकशी जागतिक दर्जाचा चित्रपट पाहायला मिळेल अशी आशा मी अलीकडं सोडुन दिली होती. पण नागराज मंजुळेंनी अनपेक्षित धक्का दिला. फॅन्ड्रीचं समिक्षकांनी चौफेर कौतुक केलं आणि मराठी रसिकांनीपण पहिल्या तीन दिवसात दिड कोटींचं माप त्याच्या पदरात टाकलं.

प्रोमोजमुळे टाईमपास सारखा पौगंडावस्थेतील प्रेमकथा वाटणारा हा चित्रपट पात्रांच्या अंतरंगात शिरत, गावातल्या सामाजिक घडामोडी टिपत शेवटाला पोचला तेव्हा चित्रपटांवर आणि माणुसपणाच्या गोष्टींवर प्रेम करणारा माझ्यातला प्रेक्षक नागराज मंजुळे नावाच्या रसायनाच्या प्रेमातच पडला.  

बऱ्याच प्रेक्षकांची अवस्था जे समोर दिसतंय तेव्हढंच ते नाही हे जाणवतं, पण काय ते कळत नाही. अन्याय, अत्याचार असेल असं वाटलं. पण तसं काहीच नाही. फक्त पिक्चर संपल्यावर पुढे काय झालं असेल या विचाराने छळ होत राहतो (मायबोली.कॉम वरुन) अशी झाली.

मला वाटतं नागराजला या कथेत अन्याय, अत्याचार असा मेलोड्रामा दाखवायचा नाहीये. त्याच्या कथेतला तो ग्रामिण समाज उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधण्याइतका प्रगत तर आहेच पण तितकाच सावध आणि संतुलितपण आहे. मग ती पाटलाची प्रतिक्रीया असो किंवा गुरुजींचं शाळेतलं वागणं. म्हणुनच चित्रपटातला कचरु माने (किशोर कदम) गावातल्या लोकांशी सलोख्याचे संबंध राखत सगळं सहन करु शकतो. पण त्याचवेळी जातिपातीवरुन हेटाळणी करणारे संग्राम पाटील आणि त्याच्या मित्रांसारखे काही समाजघटक एखाद्या जब्याचे भावविश्व उद्ध्वस्त करतात. आणि अशा वेळी आजुबाजुचा समाज फक्त बघ्याची भुमिकाच घेतो.
आपल्या आसपास सहज घडु शकणाऱ्या या गोष्टीतलं दुर्मिळ सौंदर्य टिपण्याची शब्दातीत किमया नागराज मंजुळे आणि त्याच्या टिमला जमुन गेली आहे हे नक्की.

Thursday, January 23, 2014

सौंदर्यशोध रितेपणाचा

लहानपणी एका प्रश्नाचं उत्तर माझे मित्र प्रत्येकवेळी मुली असं द्यायचे त्या प्रश्नाचं माझं उत्तर म्हाताऱ्या माणसांच्या घराचा वास असे असायचे. तो प्रश्न होता तुम्हाला आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडते. तेव्हाचं मला जाणवलं होतं की संवेदनशीलता माझ्या नशिबात आहे...

द ग्रेट ब्युटी नावाच्या इटालियन सिनेमात पहिल्या दहा मिनिटात फक्त रोमच्या सौंदर्याचे विविध नयनरम्य नजारे दिसतात. त्यानंतर एका पार्टीत भन्नाटपणे चालु असलेल्या डान्समधे एका अनपेक्षित क्षणी साठी पार केलेला एकजण थांबुन सिगरेट शिलगावतो आणि वरचे स्वगत म्हणतो. हा आहे चित्रपटाचा नायक जेप गम्बार्देला.

स्वतःच्या पासष्टाव्या वाढदिवसादिवशी ऐन भरात आलेल्या पार्टीत, रोमच्या मिडीयामधे आणि उच्चभ्रु वर्तुळामधे दबदबा असलेला जेप गम्बार्देला अचानक थबकतो आणि आपल्या आयुष्याकडे आत्मशोधक नजरेने बघायला लागतो.

मला उच्चभ्रु आयुष्य फक्त जगायचे नव्हते तर त्या उच्चभ्रु वर्तुळांचा राजा व्हायचे होते. पार्ट्यांमधे नुसते सामिल व्हायचे नव्हते तर त्या पार्ट्या उधळुन लावायची ताकद कमवायची होती.स्वतःच्या यशाचं असं वर्णन करणाऱ्या जेपला जाणवायला लागते कि मला आता न आवडणाऱ्या गोष्टी करण्यात अजिबात वेळ घालवायचा नाहीये.

रात्रीचा उत्सव करणाऱ्या पार्ट्या उरकण्याच्या पहाटेच्या वेळी जेपची रोमच्या रिकाम्या रस्त्यातली भटकंती त्याच्या आयुष्यातल्या या बदलाची सुचकता दर्शवते.

पण जसं जसं तटस्थ नजरेन तो आपल्या आयुष्याकडे बघायला लागतो तेव्हा दांभिकतेची, मुखवट्यांची आणि एका भयाण रितेपणाची आहे मनोहर तरी गमते उदास अशी काहीशी जाणिव गडद व्हायला लागते.

तरुणपणात एकच पुस्तक लिहीलेल्या जेपने परत काहीच लिखाण का केलं नाही हा त्याच्या आजुबाजुच्या सगळ्या लोकांनाच नव्हे तर (मदर टेरेसासदृश्य) सिस्टर मारियालापण पडलेला प्रश्न आहे. मी एका महान सौंदर्याचा शोध घेत राहिलो आणि ते सापडले नाही म्हणुन नविन काही लिहु शकलो नाही अशी प्रांजळ कबुलीपण जेप सिस्टर मारीयाजवळ देतो. 

रोमच्या रंगीबेरंगी रात्री, एकिकडे ऐतिहासिक वास्तु आणि दुसरीकडे मॉडर्न हॉटेल्स, जेपची तऱ्हेवाईक मित्रमंडळी, त्यांच्यातले संवाद, आणि जेपची या सगळ्याकडे बघण्याची बदलत चाललेली दृष्टी या सगळ्या सव्वादोन तासांच्या ब्लॅक कॉमेडी टाईप पसाऱ्यातली एकुण एक फ्रेम रोमन वास्तुशिल्पासारखी सुंदर आणि सुडौल दिसते. 

कान्स महोत्सवात पाम-दी-ओर मिळवलेला पावलो सोरेन्टीनो नावाच्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट, इटलीच्या अलिकडच्या नैतिक गोंधळाच्या काळाचा दर्शक आणि भाष्यकार आहे अशा शब्दात जगभरच्या समिक्षकांनी गौरवलेला आहे. 

एकंदरीत इटालियन सिनेमाच्या परंपरेचा पाईक ठरणारा हा सिनेमा तितकाच नव्या युगाला भिडणारा आणि त्याच्या सुंदर कोलाजसदृष्य फिलमुळे मला जाम आवडला. 

टाईमपास आणि फॅंड्री – मराठीतल्या प्रेमपटांची प्रगल्भता

टाईमपास चित्रपट रिलीज होऊन बरेच दिवस झाले आणि तो अजुनही एकदम धडाक्यात चालु आहे. तर फॅंड्री (नावाचा मराठीच चित्रपट) रिलीज व्हायला अजुन दोन आठवडे आहेत. पण या दोन्ही चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी ढवळुन टाकली आहे.

नटरंग मधुन व्यावसायिक सिनेमाची नस शोधलेल्या रवि जाधवांनी बालक पालक सारखा धाडसी प्रयोग केल्यानंतर टाईमपासद्वारा षटकारच ठोकला आहे.

नाव टाईमपास असलं तरी तो दुनियादारीइतका सवंग तर नक्कीच नाहीये. कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय अशा सगळ्याच पातळ्यांवर आम जनतेची पसंती मिळवलेला हा चित्रपट पहिल्या प्रेमाच्या विषयाकडे एका सामाजिक दृष्टीकोनातुन बघतो आणि त्यातही समतोलपणा राखतो हे नक्कीच उल्लेखनीय आहे. मग ते दोघांच्या वडलांच्या भेटीचा प्रसंग असु देत किंवा शेवटी दगडुच्या प्राजुच्या घरातला झडतीचा प्रसंग असु दे, संवादावर घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. अनेक ठिकाणी उगीचचा बटबटीतपणा टाळल्यामुळे, नायक नायिका दोघे वयाने लहान वाटले तरी, हि लव्हस्टोरी मनात घर करुन जाते. दोघांच्या वागण्या बोलण्यातली निरागसता आणि त्याचवेळी मोठ्यांचा समजुतदारपणा हा या कथेला एका प्रगल्भतेच्या पातळीवर नेऊन पोचवतो.

टाईमपासच्या व्यावसायिक यशाचे पडघम अजुन काही दिवस वाजत राहतील तितक्यात पुढच्या महिन्यात व्हॅलेंटाईन डे लाच फॅंड्री रिलीज होतो आहे.

अनेक चित्रपट महोत्सवातुन प्रशंसा झालेला हा चित्रपट नागराज मंजुळे या नवख्या पण तेवढ्याच ताकदीच्या दिग्दर्शकाने बनवलेला आहे. पिस्तुल्या नावाच्या लघुपटासाठी मंजुळेना 2011 मधे सर्वोत्तम पहिला लघुपट कॅटेगरीतला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

फॅंड्रीमधुन त्यांनी पौंगडावस्थेतील प्रेमभावनेच्या विषयाला हात घातला आहे. पण त्यांच्या कथेचा परिघ, मांडणी आणि धाटणी टाईमपासपेक्षा खुपच वेगळी आहेत. ग्रामीण पार्श्वभुमीवरच्या ह्या प्रेमकथेलादेखील भक्कम सामाजिक संदर्भदेखील आहे. आणि मिळालेले अनेक पुरस्कार फॅंड्रीच्या चित्रपटशास्त्रीय गुणवत्तेचे निदर्शक आहेतच.

अजुन काही आताच सांगणे उचित होणार नाही. युट्युबवर त्याचे ट्रेलर्स आले आहेत. मीपण फॅंड्री चित्रपट अजुन पाहिलेला नाही पण ज्यांनी पाहिला त्या मित्रमंडळीना ऐकल्यानंतर या दोन्ही चित्रपटांबद्दल एकत्र लिहीण्याची इच्छा तीव्र झाली.

तेव्हा फ्रेंड्स फॅंड्रीपण पाहायला विसरु नका आणि तुमचे अभिप्राय मला जरुर कळवा.

Tuesday, January 14, 2014

चित्रपटांची बरसात

चित्रपट पाहणे हा पुस्तक वाचण्याइतकाच उत्कट छंद असु शकतो आणि चित्रपट महोत्सव ही माझ्यासारख्या छंदीष्टांसाठी एक मोठी पर्वणीच असते.

महोत्सवातले चित्रपट हे मनोरंजनाच्या पलिकडे जाऊन अनेक उद्दीष्टं साध्य करतात. चित्रपटशास्त्रातल्या आगळ्यावेगळ्या प्रयोगांची ओळख होते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचं वेगळंचं आकलन होतं, वेगवेगळ्या देशांतल्या लोकांच्या समाजाच्या जीवनशैलीचं, संस्कृतीचं समग्र दर्शन घडतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार-दडपशाही-धर्मांधता-व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी प्रश्न वैश्विक असल्याचं भान हे चित्रपट मिळवुन देतात.

गेल्या काही आठवड्यात, म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूरातला (2nd Kolhapur International Film Festival) आणि या आठवड्यात पुण्यातला (12th Pune International Film Festival) अशा दोन चित्रपट महोत्सवांमुळे मी चित्रपटांमधे अक्षरशः न्हाऊन निघालो आहे.

कालच गोल्डन ग्लोब मिळालेला इटालियन द ग्रेट ब्युटी,
चिनच्या प्रगतीचे मृगजळ जवळुन दाखवणारा अ टच ऑफ सीन,
एकाच लांबलचक शॉटमधे अनेक आयुष्यं उलगडणारा इस्त्राएलचा ऍना अरेबिया,
आईसलॅंडमधल्या भ्रष्टाचारावरचा दारुडा बिभत्सपट एक्स एल्,
इजिप्तच्या जास्मिन क्रांतीत सहभागी झालेल्या पण मुबारककडुन वापरलेल्या गेलेल्या सामान्यांची परवड दाखवणारा आफ्टर द बॅटल,
अनेक तुरुंगवास भोगलेल्या डाव्या क्रांतीकारकाकडे आणि क्रांतीच्या कल्पनेकडे आजच्या पिढीच्या नजरेतुन बघणारा जर्मनीचा द विकेण्ड,
दुसऱ्या महायुद्धावेळी प्रवासात आईचा मृत्यु नजरेसमोर पाहुनसुद्धा धीटपणे पुढच्या प्रवासाला लागलेल्या मुलाची कथा सांगणारा युक्रेनचा हळुवार हाउस ऑफ अ टरेट आणि
छोट्या गावात बी ग्रेड चित्रपट दाखवणाऱ्या एका टॉकिजचे चर्चमधे रुपांतर होताना एकंदर वासना, धर्म, परंपराआदी ग्रामीण संस्कृतितल्या प्रवाहावर भाष्य करणारा मल्याळी कन्यका टॉकिज...
हे त्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट मी या आठवड्यात मित्र डॉ अनमोलबरोबर अनुभवले.
आणि हे अनुभव असे अद्भुत असतात की ते शब्दात मांडणं व्यर्थच पण मन शांत बसत नाही ना... शेअर करावसं वाटतचं म्हणुन ही पोस्ट.