“लहानपणी एका प्रश्नाचं
उत्तर माझे मित्र प्रत्येकवेळी मुली असं द्यायचे त्या प्रश्नाचं माझं उत्तर
म्हाताऱ्या माणसांच्या घराचा वास असे असायचे. तो प्रश्न होता तुम्हाला आयुष्यात
सगळ्यात जास्त काय आवडते. तेव्हाचं मला जाणवलं होतं की संवेदनशीलता माझ्या नशिबात
आहे...”
द ग्रेट ब्युटी नावाच्या इटालियन सिनेमात पहिल्या दहा मिनिटात फक्त रोमच्या सौंदर्याचे विविध नयनरम्य नजारे दिसतात. त्यानंतर एका पार्टीत भन्नाटपणे चालु असलेल्या डान्समधे एका अनपेक्षित क्षणी साठी पार केलेला एकजण थांबुन सिगरेट शिलगावतो आणि वरचे स्वगत म्हणतो. हा आहे चित्रपटाचा नायक जेप गम्बार्देला.
स्वतःच्या
पासष्टाव्या वाढदिवसादिवशी ऐन भरात आलेल्या पार्टीत, रोमच्या मिडीयामधे आणि
उच्चभ्रु वर्तुळामधे दबदबा असलेला जेप गम्बार्देला अचानक थबकतो आणि आपल्या
आयुष्याकडे आत्मशोधक नजरेने बघायला लागतो.
“मला उच्चभ्रु आयुष्य
फक्त जगायचे नव्हते तर त्या उच्चभ्रु वर्तुळांचा राजा व्हायचे होते. पार्ट्यांमधे
नुसते सामिल व्हायचे नव्हते तर त्या पार्ट्या उधळुन लावायची ताकद कमवायची होती.” स्वतःच्या यशाचं असं वर्णन
करणाऱ्या जेपला जाणवायला लागते कि मला आता न आवडणाऱ्या गोष्टी करण्यात अजिबात वेळ
घालवायचा नाहीये.
रात्रीचा
उत्सव करणाऱ्या पार्ट्या उरकण्याच्या पहाटेच्या वेळी जेपची रोमच्या रिकाम्या
रस्त्यातली भटकंती त्याच्या आयुष्यातल्या या बदलाची सुचकता दर्शवते.
पण
जसं जसं तटस्थ नजरेन तो आपल्या आयुष्याकडे बघायला लागतो तेव्हा दांभिकतेची,
मुखवट्यांची आणि एका भयाण रितेपणाची “आहे
मनोहर तरी गमते उदास”
अशी काहीशी जाणिव गडद व्हायला लागते.
तरुणपणात
एकच पुस्तक लिहीलेल्या जेपने परत काहीच लिखाण का केलं नाही हा त्याच्या
आजुबाजुच्या सगळ्या लोकांनाच नव्हे तर (मदर टेरेसासदृश्य) सिस्टर मारियालापण
पडलेला प्रश्न आहे. मी एका महान सौंदर्याचा शोध घेत राहिलो आणि ते सापडले नाही
म्हणुन नविन काही लिहु शकलो नाही अशी प्रांजळ कबुलीपण जेप सिस्टर मारीयाजवळ
देतो.
रोमच्या
रंगीबेरंगी रात्री, एकिकडे ऐतिहासिक वास्तु आणि दुसरीकडे मॉडर्न हॉटेल्स, जेपची
तऱ्हेवाईक मित्रमंडळी, त्यांच्यातले संवाद, आणि जेपची या सगळ्याकडे बघण्याची बदलत
चाललेली दृष्टी या सगळ्या सव्वादोन तासांच्या ब्लॅक कॉमेडी टाईप पसाऱ्यातली एकुण
एक फ्रेम रोमन वास्तुशिल्पासारखी सुंदर आणि सुडौल दिसते.
कान्स महोत्सवात
पाम-दी-ओर मिळवलेला पावलो सोरेन्टीनो नावाच्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट, इटलीच्या
अलिकडच्या नैतिक गोंधळाच्या काळाचा दर्शक आणि भाष्यकार आहे अशा शब्दात जगभरच्या
समिक्षकांनी गौरवलेला आहे.
एकंदरीत इटालियन
सिनेमाच्या परंपरेचा पाईक ठरणारा हा सिनेमा तितकाच नव्या युगाला भिडणारा आणि
त्याच्या सुंदर कोलाजसदृष्य फिलमुळे मला जाम आवडला.