ह्या त्या दोघांच्या कथा आहेत. दोघांची कौटुंबिक पार्श्वभुमी मध्यमवर्गीय. तो एका छोट्या शहरातला तर ती मेट्रोसिटी बनू पाहणाऱ्या मोठ्या शहरातली.
--
तो शिकायला मेट्रोसिटी बनू पाहणाऱ्या मोठ्या शहरात आला. निळ्या डोळ्यांच्या मुलीशी त्याची ओळख लॅबमध्ये प्रॅक्टिकलच्या वेळेस झाली. बघता बघता चार वर्षे कशी संपली आणि दोघं एकमेकांत कशी गुंतली हे त्या दोघांनापण समजलं नाही. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी इतक्या दिवसांचा बांध फुटला आणि प्रेमाचं प्रकटीकरण झालं, आणाभाका घेतल्या गेल्या. यथावकाश दोघही चांगल्या कंपन्यांमध्ये लठ्ठ पगारावर रुजू झाली. अनुभव, परदेशवारी हे टप्पे पण ओलांडले. कामानंतरच्या राहिलेल्या वेळेपैकी निम्म्यापेक्षा जास्त वेळ एकमेकाशी फोनवर, नेहमी भेटण्याच्या ठिकाणी गप्पा मारण्यातच जात होता. अशात एके दिवशी निळ्या डोळ्यांच्या मुलीचा त्याला एस. एम. एस. आला. "आपल्याला आज महत्त्वाचं बोलायचंय. सकाळी आई-बाबांनी लग्नाचा विषय काढला. आई वधूवर सूचक मध्ये नाव नोंदवून आली आहे. "
--
तिचं शिक्षण मुलींच्या शाळेत आणि मुलींच्याच कॉलेजमध्ये झाल्यामुळे मुलांशी फारसा संबंध आला नाही. नोकरीला लागली तेव्हा प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने त्या उंच धिप्पाड मुलाशी तिची ओळख झाली. तशी ऒफिसमध्ये बरीच मुलं होती पण तो तिला खूपच आवडला आणि मदतीच्या नावाखाली तोसुद्धा तिच्या डेस्कवर खूपवेळा रेंगाळायला लागला. अगदी मॅनेजरनेपण संकेत ओळखून दोघांना एकाच प्रोजेक्टवर टाकण्याचा शहाणपणा दाखवला. एकदा अशाच एका बिझी प्रोजेक्ट डिलिव्हरीनंतर ऒफिसमध्ये पिझ्झा खाताखाताच उंच धिप्पाड मुलानं एकांताची वेळ साधून तिला तू मला खूप आवडतेस असं सांगून टाकलं. तिने नापसंती दर्शवण्याचा प्रश्न नव्हताच. ऒफिसमधेपण सगळ्यांना कळलं आणि तिला नाइलाजाने कंपनी बदलावी लागली. पण दोघ ऒफिसबाहेर पूर्वीप्रमाणेच भेटत राहिली. एके दिवशी त्या उंच धिप्पाड मुलानं तिला सांगितलं, "माझ्या आईनं तुला या विकेण्डला घरी बोलावलंय. "
--
त्याने निळ्या डोळ्यांच्या मुलीला घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगण्यास सुचवलं. त्याने स्वत: एका सणानिमित्त घरी चक्कर टाकली तेव्हा घरच्यांच्या कानावर हि गोष्ट घातली. सणासुदीचं वातावरण क्षणात पालटलं. निळ्या डोळ्यांच्या मुलीच्या घरीसुद्धा असाच काहीसा प्रतिसाद मिळाल्याचा एस. एम. एस. त्याला आला. त्याला हे जरा अनपेक्षितच होतं. त्याच्या मित्राच्या प्रेमविवाहाच्या वेळी मित्राला मानसिक आधार देणारे आपले बाबा एवढ्यात कसे काय बदलले हे त्याला काही कळेना. त्याने याबाबतीत बाबांना विचारले तेव्हा ते म्हणाले, "तुझ्या मित्राची गोष्ट वेगळी आहे. आपण आपल्या रीतिरिवाजानुसारच वागायचं. "
"आंतरजातीय विवाहामुळे नंतर खूप प्रॉब्लेम्स होतात. तुम्हाला मुलं होतील त्यांची लग्नं तुम्ही कशी करणार? त्या अमक्या शेजाऱ्यांच्या मुलीच लग्न फक्त त्या कारणामुळे कितीतरी वर्षं अडलेलं आपण बघतोच आहोत ना. " - इति त्याची आई.
निळ्या डोळ्यांच्या मुलीच्या घरी असाच संवाद घडून आला होता. "तुला त्यांच्या छोट्या शहराच्या वेगळ्या वातावरणात ऍडजस्ट करायला जमेल का? ". "त्यांची आणि आपली फॅमिली बॅकग्राउंड खूपच वेगळी आहे. " इत्यादी इत्यादी.
आता त्याच्या डोक्यात मोठा खड्डा पडला होता. त्याला वाटायचं पुढारलेल्या विचारांच्या आपल्या आईबाबांकडून प्रेमविवाहाला संमती नक्कीच मिळेल. शिवाय जग किती पुढं गेलं आहे. आपण एकविसाव्या शतकात आहोत वगैरे वगैरे.
--
तिलाही आपल्या घरी त्या उंच, धिप्पाड मुलाबद्दल सांगणं भाग होतं. त्याच्या घरच्यांची संमती होतीच. पण त्याचं नाव गाव कळल्यावर तिच्या घरचं वातावरणही तंग झालं. प्रेमविवाहाला तिच्या आईबाबांचा विरोध नव्हता. फक्त मुलाचं परप्रांतीय असणं खटकत होतं. आणि नुसतंच खटकत नव्हत तर ते पार अमान्य होत. विषय ताणत गेला तसा तिच्या बाबांनी अबोलाच धरला. आई तिला परावृत्त करायचा आटोकाट प्रयत्न करायला लागली. तिचं म्हणणं, "त्या दादाचं (तिच्या चुलतं-भावाचं) लग्न असंच परप्रांतीय मुलीशी झालं आहे. "
"मुलांचं वेगळं असतं, त्यांना चालत पण मुलींना नाही चालतं" - तिच्या आईचा तिला न झेपलेला युक्तिवाद.
"अग पण आपल्या समाजातल्या कितीतरी मुलींची अशी लग्न झाली आहेत" - तिचा वेगळा प्रयत्न.
"पण त्यातल्या निम्म्या नंतर घटस्फोट होऊन परत येतात, हे विसरू नकोस. " - या उत्तरावर तिची बोलती बंद.
--
त्याच्या खास मित्रांमध्ये एक परिसंवादच घडून आला. बाजूचे आणि विरुद्ध असे दोन तट आपोआपच पडले.
"तुम्ही एकमेकाला इतक्या दिवसांपासून ओळखताय, तेव्हा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. "
"येतात, प्रॉब्लेम्स येतात. अरे मोठ्या शहरातल्या मुलींना आपल्यासारख्यांच्या घरी ऍडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम्स येतात. माझ्या भावाच्या उदाहरणावरून सांगतो. "
"अरे पण लग्नानंतर सासरी ऍडजस्ट करायचा प्रॉब्लेम युनिव्हर्सली सगळ्याच मुलींना येतो. "
"तसं नसतं ते. त्यांच्या आणि आपल्या घरच्या संस्कृतीत आणि संस्कारांत खूपच फरक असतो. तो ओलांडणं खूप अवघड असतं मुलींसाठी. शिवाय मुलीच्या घरची आणि वातावरणाची सधनता व सुबत्ता आपल्यापेक्षा जेवढी जास्त तेवढा मोठा हा प्रॉब्लेम. "
"आता सगळ्या मध्यमवर्गियांच्या सुबत्तेत थोडाफार फरक असणारच. आपण सगळे मध्यमवर्गीय असणं पुरेसं नाही का? आणि तडजोड तर कुठेही करावी लागतेच. "
"आता नोकरीच्या ठिकाणी, जिथं आपण आपलं जवळपास एक तृतियांश आयुष्य घालवतो, तिथही कंपन्या बदलू तसं आपण आपल्या वरिष्ठांबरोबर ऍडजस्ट करायला शिकतोच की!"
"ऒफिस आणि लग्नाचं खूप वेगवेगळं असतं. अशी तुलना करताच येणार नाही. "
"अरे या मोठ्या शहरातल्या मुलींना आपली शहरं म्हणजे खेडीच वाटत असतात. माझी वहिनीपण आमच्या घरी आईबाबांकडे यायचं नावं काढलं की कटकट सुरू करते. "
"कोणतीही मुलगी लग्नानंतर वेगळी राहत असली की आपल्या सासरी जायचं म्हणजे कटकट करतेच. आता तुझी आईच तुझ्या बाबांच्या खेडेगावी आतापर्यंत किती वेळा जाऊन आली सांग ना. "
--
असाच परिसंवाद तिच्या मैत्रिणींच्यातपण झाला.
"पण नक्की कशासाठी विरोध करताहेत तुझे आईबाबा. त्यांना मुलीपेक्षा त्यांची प्रतिष्ठा जास्त मोठी वाटते का? "
"तसं ते काहीच म्हणत नाही. तुला जमणार नाही आणि आम्हाला आवडणार नाही एव्हढंच एकदोनदा म्हणाले. आजकाल विषय काढला की एकदम गप्पच बसतात आणि मग दोन दिवस आम्ही तिघ धर्मशाळेत राहत असल्यासारखे घरात वावरतो. मला ते फार असह्य होत. "
"तू आईबाबांना सांगून घरातून बाहेर का पडत नाहीस? "
"म्हणजे पळून जा असंच ना. पळून जाणं हा काही ऒप्शन नाहीये. शेवटी आपल्यावर पण काही संस्कार झाले आहेतच की. "
"तुला काय वाटलं ’दिलवाले दुल्हनिया’ सारखं तुझे बाबा एक दिवस तुला त्याच्याबरोबर जा म्हणून सांगतील? थोडं डिप्लोमॅटीकली वागायला काय हरकत आहे. "
"पळून गेल्यावर चार महिने गप्प बसतील. नंतर आपोआपच सगळं सुरळीत होईल. "
"आमच्या घरातल्यांचं काही सांगता येत नाही. माझ्या एका आत्यानं आजोबांच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून ते आयुष्यभर तिच्याशी बोललेच नाहीत. "
"त्यांचं आणि आपलं कल्चर खूप वेगळं असत. "
"पण आपल्यासारख्या खूपश्या मुली शिकायला परदेशात गेल्यानंतर तिकडच्या मुलाशी लग्न करतातच ना. "
"ते वेगळं असतं. त्यांना तिकडचं सेटल व्हायचं असतं. इथं राहायचं म्हटल्यावर प्रॉब्लेम येतोच. "
"आपल्या संस्कृतीत आणि पाश्चात्य संस्कृतीत खूप फरक आहे. आपल्याकडे सगळ्यांचे सणवार, रीतिरिवाज खूप वेगवेगळे असतात. एक पद्धत सोडून दुसरी आत्मसात करायची म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त संसाराचा काळ त्यांतच जाणार. "
"आजकाल शहरात कोणी पाळतं का एवढे रीतिरिवाज, असतो का कुणाला वेळ सणवार साजरे करायला? "
"असं काही म्हणू नकोस. त्या टीव्ही सिरीयल्समुळं आता तर त्या गोष्टींना खूप उधाण आलंय. स्टेटस सिंबॉल झाल्यात त्या गोष्टी. आणि भरीस भर म्हणून सगळी सामग्री रेडीमेड पुरवणारं मार्केट असतंच. "
"शिवाय सध्या ’परप्रांतीय’ या मुद्द्यावरून सध्या सगळीकडे उडालेला गदारोळ तुला माहिती आहेच. "
--
त्याचा त्याच्या बाबांबरोबरचा हा कलगीतुरा.
"कॉलेजचे दिवस वेगळे असतात, मी समजू शकतो. पण लग्न हे पूर्णपणे वेगळे असते. त्यात बऱ्याच गोष्टी तपासून बघाव्या लागतात. "
"ताईच्या लग्नाच्या वेळी तर तुम्हीच येईल त्या पाहुण्यांना म्हणायचे ’मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा आवडणं महत्त्वाचं. ’"
"तसं म्हणायच्या आधी बाकी सर्व बाबींची चौकशी झालेली असायची. स्थळं सुचवणारी माणसं आणि मंडळं विश्वासातली होती. आपल्याकडे लग्न हे दोन कुटुंबाचं मिलन असत त्यात त्या कुटुंबांचे आचार विचार जुळणं हे महत्त्वाचं असतं. "
"पण आम्ही निर्णय घ्यायच्याआधी ह्या सगळ्याचा विचार केला नसेल असं वाटतं का तुम्हाला? "
"तुम्हाला या जगाचा काही अनुभव नाही. चार पैसे मिळायला लागले की तुम्हाला वाटतं तुम्ही फार शहाणे झालात. "
"पंचविशी उलटली आमची आता. अजूनही आम्हाला काहीच कळत नाही अस वाटतं का तुम्हाला. "
"कळत असतं तर असा अविचार केलाच नसता तुम्ही. आम्हाला एका शब्दानं तरी विचारलं का असा विचार करण्याआधी? "
"म्हणजे तुमचा विरोध नक्की कोणत्या कारणामुळं? त्यांच्याशी आपलं जुळणार नाही म्हणून की तुम्हाला आधी विचारलं नाही म्हणून? "
शेवटचं वाक्य त्याच्या मनातच राहिलं. कारण उलट न बोलण्याचे सुसंस्कार!
--
सलग पाचवा मुलगा काहीही कारण न देता तिनं नाकारल्यानंतर तिची आई वैतागली.
"आम्हाला कळत नाही का तू मुलं का नाकारतीयेस? "
"मग तुम्ही का सपोर्ट करत नाही आमच्या लग्नाला? "
"तुला वाटतं तेव्हढं सोपं नसतं ते मुली. तू अशी आपल्या घरच्या स्वतंत्र वातावरणात वाढली आहेस. तुला अजिबात जमणार नाही त्या तसल्या वातावरणात जुळवून घ्यायला. "
"न जमायला काय झालं. त्याच्या घरचेसुद्धा खूप मॉडर्न विचारांचे आहेत. त्याच्या घरच्यांना मान्य आहे. "
"त्यांना मान्य नसायला काय झालं. त्यांचा सगळा गोतावळा सोडून ते येथे येऊन राहिलेत. आपले सगळे पै-पाहुणे इथेच आहेत. त्यांच्यात तोंड दाखवायला जागा राहिलं का आपल्याला. शिवाय तू इतकी नातेवाईकांच्यात रमणारी, तुला जमणार आहे का त्यांच्यासारखं एकलकोंडं राहायला? "
--
तो नेहमीच्या ठिकाणी निळ्या डोळ्यांच्या मुलीला भेटायला आला होता.
"आपलं काही वर्क आऊट होईल असं वाटत नाही. कारण मला नक्की सांगता येणार नाही. आणि कधी सांगता येईल असं वाटत नाही. "
"फाईन. मी निघते मग. बेस्ट ऒफ लक. " - तिनं तिच्या उच्चशिक्षित, स्मार्ट पर्सनॅलिटीला साजेसं उत्तर देऊन विषय संपवला. त्याच्यासमोर अश्रुबिश्रू ढाळत बसण्याचा सवालचं नव्हता.
"सेम टू यू. टेक केअर. " - एवढंच तो इंग्रजीचा आधार घेत औपचारीकपणे म्हणू शकला.
--
तिचा ब्रेक अप जरा कठिण होता.
"मग काय ठरवलं आहेस तू" - त्या उंच धिप्पाड मुलानं बऱ्याच वेळ वाट बघून सुरुवात केली.
"मला नाही माहीत. "
"म्हणजे... वुई आर बॅक तू स्क्वेअर वन!! आपल्या आतापर्यंतच्या नात्याला काहीच अर्थ नाही का? "
"असं कसं. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस होते. "
"मग पुढे काय? आपण लग्न करायचंय की नाही? "
"मला खरंच नाही माहिती. आईबाबांच्या परवानगीशिवाय मी काहीच करू शकत नाही. "
"म्हणजे काय? "
"तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. तू माझी वाट नको बघू. "
"म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं नाही असं तू स्पष्ट का म्हणत नाहीसं. "
"... "
"अशा शांत बसण्याचा अर्थ मी काय घ्यायचा? "
"आता आपण यापुढे एकमेकांना भेटायचं बंद करू. "
"हा तुझा पक्का निर्णय आहे. "
"हो. "
"ठीक आहे. बाय देन. "
--
तो रूममध्ये कॉटवर पंख्याला डोळे टांगून आपण निळ्या डोळ्यांच्या मुलीला का नकार दिला याचा विचार करत पडला होता. आपण या निर्णयापर्यंत कशामुळे येऊन पोचलो ते काही केल्या त्याला सुधारत नव्हतं. आपण समाजाला घाबरलो की आईबाबांच्या दडपणाला बळी पडलो की मित्रांनी वर्तवलेल्या भविष्याला परिणामांना घाबरलो. नकार दिला एवढंच त्याला स्पष्टपणे आठवत होतं.
--
आपल्या त्या उंच धिप्पाड मुलाबरोबरच्या शेवटच्या बोलण्याची संगती लावायचा प्रयत्न करून करून तिचंही डोकं दुखायला लागलं होतं. त्याला परत कॉंटॅक्ट करावा की करू नये, आईबाबांशी या विषयावर परत बोलावं की बोलू नये, कशाचाच निर्णय तिला घेता येत नव्हता. तिला आपल्याला नक्की काय हवंय तेच कळत नव्हतं. त्यामुळं ती तो विषय सोडून दुसऱ्याच गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करत होती.
Tuesday, October 14, 2008
Tuesday, September 23, 2008
सज्जनपूर आणि वळू
नुकताच श्याम बेनेगल यांचा "वेलकम टु सज्जनपूर" बघितला. पिक्चर एकदम झक्कास! नकळत मराठीतल्या वळुशी तुलना झाली. आता चित्रपटातल्या (मुख्यत: तथाकथित व्यावसायिक आणि विनोदी) कल्पनांना फारसं तर्कनिष्ठ दृष्टीनं (लॊजिकली) बघू नये असं म्हणतात. म्हणजेच त्यांचं "चित्रपटीय स्वातंत्र्य"(सिनेमॅटीक लिबर्टी) जरी मान्य केलं तरी या दोन विनोदी चित्रपटांच्या विषय व पात्ररचना यांबाबतीत मला काही निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात.
"वळू" काही अंशी उगीचच "गावच्या लोकांचे व गावातल्या वातावरणाचे थटटास्पद चित्रण" असल्यासारखा वाटतो. आता काहींच्या मते उपहासात्मक विनोद हाच तर अशा विनोदी चित्रपटांचा गाभा असतो. पण विनोद परिस्थितिजन्य असेल तर जास्त भावतो. शिवाय वळुमधली पात्रे काहीशी संदर्भहीन व उथळ म्हणजेच वळुला पकडण्यासाठी पकडून आणलेली गर्दी असल्यासारखी वाटतात. "वळू" मध्ये मुख्य विषय धर्माशी निगडित असूनसुद्धा, विषयाची धार्मिक बाजू काहीच धुंडाळलेली दिसत नाही. वळुबद्दलच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा, यांमधला संघर्ष असे परिमाण कथेला देता आले असते. धर्माशी निगडित असलेलं एकमेव पुजाऱ्याचं पात्र विदूषकाच्या पातळीवर आणून ठेवलं आहे. गावकऱ्यांना त्या वळुचा होणारा त्रास हा चित्रपटात कुठचं प्रकर्षानं जाणवत नाही. दिग्दर्शक म्हणतात त्याप्रमाणं "एखाद्याच्या स्वातंत्र्यावर उगीचच निर्बंध लादण्याची मॊब सायकॊलॊजी" (नेमकं माहीत नाही, असंच काहीसं चू. भू. दे. घे. ) हेसुद्धा त्या प्रकर्षानं जाणवत नाही. पडद्यावर जे प्रामुख्यानं दिसतं ते म्हणजे त्या वळुला पकडण्यासाठी आणि त्यानिमित्ताने प्रसिद्धी मिळवण्यासाठी (डाक्युमेंट्री) गावकऱ्यांची चाललेली आचरट धडपड आणि त्यामध्ये डोकावणारं विनोदी राजकारण. दिग्दर्शकांच्या मताप्रमाणचा विषयाचा सीरियस दाखवणारी दोनचं पात्र, वळुच्या बाजूनं असलेली, जीवन्याची आई आणि वेडी. पण तीसुद्धा त्या धरपकडीच्या जत्रेत हरवल्यासारखी वाटतात.
त्यामानाने "सज्जनपूर" गाव बहुरंगी आणि बहुढंगी आहे. गावातल्या ग्राम्यजीवनाच्या सर्व अंगांना, म्हणजेच राजकारण (सरपंच निवडणुक), धर्म (महंमद), जातपात (अहिरवार-जमीनदार), श्रद्धा-अंधश्रद्धा (कुत्र्याशी लग्न, देवाचं पत्र), अलुते-बलुतेदारांची वाताहत (सपेरा), नोकरीसाठी शहरवासी झालेल्या कुटुंबांची दुरवस्था (कमला, मौसी) इत्यादी सगळ्यांना, (पुसटसे का होईना) स्पर्श करण्यात "सज्जनपूर" यशस्वी होतो. तेही कुठल्याही अंगाबद्दल प्रचारकी न होता. गावातली सगळी पात्रं खूपच खरीखुरी वाटतात. पात्रांची सुष्ट-दुष्टं रुपं आहेत. महादेव ह्या मध्यवर्ती पात्राभोवती चित्रपट फिरता ठेवला आहे आणि बाकी पात्रे ठराविक उद्देशानेच पडद्यावर येतात. तरीही सगळी पात्रे गावच्या रचनेतील त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यात व गावचे वास्तववादी चित्र पूर्ण करण्यात यशस्वी होतात.
आता चित्रपट म्हणून "सज्जनपूर" वातावरणनिर्मितीसाठी (गाण्यांच्या भडिमाराबरोबर) खूप वेळ घेतो, ज्यामुळे चित्रपटाच्या पूर्वार्धात प्रेक्षकांचा काहीसा रसभंग होतो.

Tuesday, September 16, 2008
फेमिनाइन कोशंट
गाडी फाटकाबाहेरच्या ट्रॅफिकमध्ये आणि प्रदूषणाच्या ढगामध्ये पोचली आणि तिच्या विचारांची टकळी सुरू झाली.
आता मला कुठला मुलगा आवडतंच नाही हा माझा दोष आहे का? "बघितलेली" सगळी एकजात बावळट तरी वाटतात किंवा "ध्यान" दिसतात. आजूबाजूला दिसणाऱ्यांपैकी जी आवडतात ती अगोदरपासूनच कुठल्यातरी बावळट पोरीच्या प्रेमाततरी असतात नाहीतर "विवाहित". उगाचच "वय वाढतंय" या सबबीखाली कोणाशीही लग्न करायचं का? आणि नाहीच करावसं वाटलं लग्न तर बिघडतं कुठे. हे जेव्हा आई बाबांसमोर बोलले तेव्हा सहा रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंपाचा धक्का बसावा अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिली होती. सगळे मिडियावाले विनाकारण एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतात. जरा मध्यमवर्गियांच्या मनात डोकावून बघा म्हणावं, अजून पेशवाई जशीच्या तशीच आहे.
चहाच्या वेळी आमच्या ग्रुपमधल्या त्या पढीक मूर्खाच्या (हे मी त्याला ठेवलेलं नाव) विश्लेषणाचं गटार परत वाहू लागलं. प्रत्येक गोष्टीचा कीस पाडणे (त्याच्या शब्दात ऒब्जेक्टीव ऍनॅलिसिस करणे) हा त्याचा आवडता छंद आहे. तर आज महाशय म्हणाले आजकाल बऱ्याच पोरींचा फेमिनाइन कोशंटच कमी होत चाललाय. विशेषत: आयटीमधल्या पोरींचा. कुठल्यातरी परदेशी संशोधनाचे दाखले देत याचं विश्लेषण सुरू झालं. कशा आजच्या मुली मुलींसारखं वागणं विसरल्या आहेत. हे निसर्गाच्या कसं विरुद्ध आहे वगैरे. बासचं. आम्ही सगळ्याजणी भांड भांड भांडल्यावर, दृष्टिकोन (perception) वेगवेगळे असू शकतात अशी तात्त्विक पिंक टाकून त्यानं काढता पाय घेतला.
जाग्यावर येऊन बसले. घड्याळाप्रमाणे बरोबर पंधराच मिनिटांनी जागेवर बसत होते तरी लीडबाबा (आमचा प्रोजेक्ट लीडर) "आली चहाच्या निमित्तानं तासभर चकाट्या पिटून" असा नेहमीचा लुक दिला. टीममधली शिला जवळ येऊन सांगू लागली. अग त्या टोपीने काहीच नीट काम केलेले नाहीये. टोपी म्हणजे आमच्या टीममधला स्वयंघोषित डॊट नेट एक्स्पर्ट. तिला म्हणजे त्या टोपीला खाऊ का गिळू असं झालं होतं. एकावेळी दोन दोन प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे बरचसं काम याच्याकडून करून घ्यायची जबाबदारी मॅनेजरने आमच्याकडे दिली होती. शिकवण्याच्या हजारएक पद्धती आम्ही दोघींनी आळीपाळीने त्याच्यावर अमलांत आणल्या होत्या. शिला एकदा म्हणाली मी माझ्या लेकालापण त्याच्या पाच वर्षाच्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं कधी काही सांगितलं नाही. पण त्याचं कामाचं घोडं कुठ अडत होतं काय माहिती! मॅनेजरसाहेबांकडे जाणं भागच होतं. आता तो, आम्ही दोघी आणि न्यायाधीश मॅनेजरसाहेब असा खटला चालू झाला. खूप वादावादी झाली. साहेबांचा पेशन्स जसा जसा संपत होता तसतसा त्यांचा आवाज वाढायला लागला. तरी टोपी काही समेवर यायला तयारच नव्हता. शेवटी साहेबांचा आवाज कॊर्पोरेट संस्कृतीला विसंगत इतका मोठा आणि घोगरा झाल्यावर टोपी बरळला, मला मुलींच्या प्रोजेक्टवर कामच करायचं नाही. आमच्या दोघींच्या डोक्यात शंभर सूर्यांएवढा लख्ख प्रकाश पडला. हसावे की रडावे काहीच कळत नव्हते. काही म्हणणं तर दूरचं राहिलं. प्रसंगावधान राखून शीलाने दुसऱ्या प्रोजेक्टवर महत्त्वाचा कॊल आहे असं सांगितले आणि आम्ही दोघी तिथून बाहेर पडलो. जागेवर येऊन पाच मिनिटं आम्ही काही न बोलता एकमेकींकडं बघत बसलो होतो.
त्या नवीन मॅनेजरकडे जाऊन त्याला परत एकदा आठवण करून दिली. साईटवर कमिशनिंगसाठी पाठवणार म्हणून (मनातल्या मनात: गाजर दाखवून) एक महिना झाला होता त्याची. अजून कशी काही हालचाल नाही म्हणून विचारलं तर म्हणाला बरं झालं आलीस. तुझ्याकडून काही गोष्टी कंफर्म करायच्या होत्या. म्हणजे साईटवरच्या कामात बरेच धोके असतात. बरंच शारीरिक कष्टाचं काम असतं. उंचावर जावं लागत. तासतासभर उभारावं लागतं. आता तुला जमणार नाही असं मला म्हणायचं नाही पण परत एकदा कंफर्म करायचं होतं. मी एन. सी. सी., युथ एक्सचेंज इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व तथाकथित पुरुषी कसरती करून आले आहे हे फिरून एकवार त्याला सांगितलं. सर्टिफिकेटं आणून दाखवू का, एवढंच विचारायचं बाकी राहिलं होतं. तरी मुलींकडून डबल कंफर्मेशन घेणं गरजेच आहे असं विकट हास्य करत तो बोलला.
बरोबर साडेपाच वाजता काम उरकून मशीन बंद करणार इतक्यात मी निघणार हे अंतर्ज्ञानानं कळल्यासारखा लीडबाबा उठून माझ्या जागेवर आला आणि एक महत्त्वाचं काम समजावून द्यायला लागला. निघायच्या वेळेसच महत्त्वाची कामं डिस्कस करण्याची याची सवय आता चांगलीच माहिती झाली होती. त्याला तोडत मी आजच काम झालंय हे उद्या केलं तर नाही चालणार का? असं विचारलं तेव्हा त्यानं एकवार घड्याळाकडं आणि एकवार माझ्याकडे बघितलं. घड्याळाच्या काट्याबरोबर यायचं आणि जायचं अस कस चालेल आयटी कंपनीत. एवढ्या लवकर जायचं तर तुम्ही येताच कशाला आयटी कंपनीत. येऊन आमच्यावर काय उपकार करता का तुम्ही. या अर्थाचे सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. पण प्रत्यक्षात माझ्या कामाच्या काटेकोरपणामुळे ठीक आहे एवढंच तो म्हणू शकला.
पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना, विश्लेषणवीर पढीक बाय करून गेला आणि "फेमिनाइन कोशंट" आठवला. विचारांची टकळी पुन्हा सुरू झाली. समान वागणुकीच्या बोंबा तर मारायच्या पण नेहमी उपकार करत असल्याची, सांभाळून घेत असल्याची, फेवर करत असल्याची भावना. नोकरीवालीच बायको पाहिजे पण तिचा पगार आपल्यापेक्षा जास्त असता कामा नये. मुलींच्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं नाही. लीड म्हणून मुली नकोत. यांची चार चार पोरं कमिशन साईटवर राडा करून आलीत पण आम्हाला मात्र संधी न देताच आमच्या कुवतीवर शंका घ्यायची. त्या शीलाचा नवरा फक्त सकाळी उठल्यावर चादरीच्या घड्या घालतो आणि चहा करतो पण मित्रमंडळीमध्ये बायकोला घरकामात पूर्ण मदत करतो असं सांगत फिरतो. हे लोक ऒनसाईटवर डाळभात खाऊन जगणार आणि सगळा स्वयंपाक येत असल्याच्या तोऱ्यात मिरवणार. व्यवस्थित प्लॅन करून, वक्तशीरपणे कामं करता येतात. पण जेव्हा सगळं ऒफिस रिकामं होणार असतं तेव्हाच हे अगदी मन लावून काम करणार. जणू काही ते वेळेत घरी गेले तर दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीचा स्टॊक मार्केटवरचा शेअर खालीच घसरणार आहे आणि तो वरती रोखून धरायचं काम यांना रात्री उशीरापर्यंत करायचंय. काम करायला ऒक्सिजन (आग आणि मूर्ख विरुद्ध टोकाला असणारी तंबाखूची कांडी) लागतो असं म्हणत दर तासाला पंधरा पंधरा मिनिट गायब राहणार. मग काय हे लोक बारा बारा तास ऒफिसमध्ये बसलेले दिसणारंच. आम्ही पाच मिनिट मोबाईलवर आलेला कॊल घ्यायला जागेवरून उठलं की यांच्या डोळ्यावर येणार. पण प्रोजेक्ट डिस्कशनच्या नावाखाली तासतासभर क्रिकेट, स्टॊक मार्केट, रिअल इस्टेटपासून मोबाईल, कार्स, कपडे, हेअरस्टाइल यापर्यंत सगळ्या विषयांवर गप्पा मारत बसणार.
मेट्रोसेक्शुअल मेल असं म्हणत यांचा फेमिनाइन कोशंट वाढत चाललाय. मग मुलींचा कमी झालेला दिसला तर बिघडलं कुठं?

Sunday, September 14, 2008
उत्तर
काहीतरी करत राहणं महत्त्वाचं. मोकळ्या वेळी पहिल्यांदा मनात जे येईल ते सुरू करावं. नंतर कदाचित मन पलटी मारेल आणि काहीतरी वेगळं करावंस वाटेल. पण मग लगेच ते नवीन काहीतरी करणं उत्तमच. म्हणजे किचन साफ करताना काही वाचावंसं वाटलं किंवा मेल चेक करता करता झोपावं वाटलं किंवा अभ्यास करता करता काही लिहावंसं वाटलं. या सर्व वेळी हातातलं सोडून नवीन करणं म्हणजे त्या क्षणाला पूर्णपणे न्याय देणं. वर्तमानात जगणं. भारंभार पुस्तक वाचून किंवा चित्रपट बघून, लिखाणासाठी काही सुचलंच पाहिजे हे चुकीचंच. आणि त्याचा वेगळं काहीतरी घडण्याशी संबंध अजिबात नाही. वर्षानुवर्ष एकच काम करत राहणाऱ्या काही व्यक्तींकडूनसुद्धा साहित्यनिर्मिती झाली असेलच. म्हटलं तर वेगळं असं कधीच काही घडत नसतं. म्हटलं तर प्रत्येक क्षण नित्यनूतन आहे. बऱ्याच वेळेस काहीच वेगळं न वाटणं हिसुद्धा एक संवेदनाच. आपल्या वाढलेल्या अनुभवातून, त्यातून घेतलेल्या धड्यातून तयार झालेली. वेगळं म्हणजे कदाचित आपल्या पंचेंद्रियांच्या वेगवेगळ्या अनुभवातून तयार होऊ शकणाऱ्या असंख्य कॊंबिनेशनमधलं, मेंदूमध्ये न साठवलेलं एक कॊंबिनेशन. मेंदू कदाचित अतिशहाणपणाने त्या कॊंबिनेशनला वेगळं ठरवत नसेलही. पण ते कॊंबिनेशन तो मेंदू साठवणार हे नक्की आणि परत कधी त्याला उपरती झालीच तर "त्यावेळी आपण वेगळं काहीतरी अनुभवलं" अशी आठवण नक्की करून देणार. लिहिण्याची अथवा निर्मितीची प्रतिभाषक्ती कुठूनही येवो, देवाच्या प्रसादातून किंवा आपल्या प्रयत्नातून, आपण फक्त तिला शरण जाऊन आपलं निर्मितीचं काम करत राहायचं. चांगलं, वाईट कुणी काहीही म्हणो, कुणी छापो न छापो अथवा विको न विको आपण फक्त आपल्याला आनंद देईल ते काम करत राहावं. मग यात त्या प्रसाद वाटणाऱ्या देवाच्या किंवा निसर्गाच्या अस्तित्वाचा मुद्दा कुणी कसाही मांडला तरी फरक काय पडतो.
प्रश्न काय पडत राहणार. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना आणखी एखादा प्रश्न पडणं हे कदाचित त्या प्रश्नाला साजेसं उत्तरचं. शैक्षणिक पात्रता किंवा नोकरी किंवा पगार याचा बुद्धीशी संबंध असेल कदाचित पण बुद्धीचा संबंध पडणाऱ्या प्रश्नांच्या संख्येशी नक्कीच नसावा. असला तरी मग असं म्हणावं लागेल की बाकीचे दुर्दैवी आहेत की त्यांना आपल्याएवढे प्रश्न पडत नाहीत. या प्रश्न पडण्याचा एकटेपणाशी संबंध नसावाच बहुतेक. कारण संसारात रमलेल्या, एखाद्या गोष्टीत गुंतलेल्या लोकांना कुठलेच प्रश्न पडत नाहीत असे अशक्य आहे. त्यांचे प्रश्न निराळे असतील. आता एकटेपणा हा बहुतेक मनातल्या तुटलेपणाच्या अवस्थेशी जोडलेला आहे. आपण जितके स्वत:ला इतरांपासून वेगळे समजू, निसर्गापासून वेगळे समजू, जितकी आपली दु:ख आपल्याला वेगळी वाटतील, जितकी ती आपण स्वत:जवळ ठेवू आणि त्यांच्या चक्रव्यूहात अभिमन्यूसारखं अडकण्यात आणि दु:खरुपी कौरवांकडून संहारीत होण्यात धन्यता मानू, तेवढी आपली एकटेपणाची भावना अधिक. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, स्वतंत्र विचारांच्या या कल्पनांचा आधुनिक, अवास्तव आविष्कारसुद्धा कारणीभूत आहे या एकटेपणाच्या भावनेला. व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नावाखाली आणि विचारांच स्वातंत्र्य जपण्याच्या नावाखाली आपण आपल्याच माणसांपासून, निसर्गापासून तोडले गेलो तर एकटं वाटण अपरिहार्यच. शिवाय एकटेपणा संपवण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीत, छंदात स्वत:ला यंत्रवतपणे गुंतवून घेतल्यामुळं हा एकटेपणा संपणार नाही हे नक्की. त्यासाठी कुठंतरी मनाच्या तारा जोडता आल्या पाहिजेत. मग भले ती गोष्ट निर्जीव असेल. निर्जीव विषयांवरच्या संशोधनात आयुष्य कारणी लावणाऱ्या संशोधकांची उदाहरणं काही कमी नाहीत. खूप विचारांनी येत असेल एकटेपणा, पण विचार योग्य दिशेनं प्रवाही ठेवले तर बहुतेक खूप विचार खूप लाभदायकच ठरतील. मग विचारांचं मोजमाप गौणंच ठरतं. फक्त तुटलेपण टाळता आलं पाहिजे. शेवटी काय, खूप पूर्वी आपल्या पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे आपण एकटे नसतोच कधी. सगळं चराचर म्हणजे आपणच असतो. आपणच या सगळ्या जगात सामावलेलो आहोत आणि आपल्यातच सगळं जग सामावलं आहे.
प्रश्नही आपलेच. उत्तरही आपलंच. सगळं एकच आहे. सगळं एकच तर आहे.
(प्रेरणाः मिलिंद बोकील यांची "एकम")

Wednesday, September 10, 2008
प्रश्न?
आता वाचावं की लिहावं की झोपावं की मेल चेक करावे की चॅटिंग करावं की किचन साफं करावं की लॊंड्रिचे कपडे आवरावे? वाचायचं तरी काय? कथा की कादंबरी की साधना की वाचायची राहिलेली वर्तमानपत्रं की अभ्यासाचं काही? आवराआवरीच्या कामाचा एवढा कंटाळा का येतो? आणि संध्याकाळीच ऒफिसमधून निघताना मेल चेक करून झाल्यानंतर मधल्या वेळात आपल्याला कोण मेल करणार आहे? आणि चॅटिंगला सगळी दररोज भेटणारी मित्रमंडळी, वेगळं काय चॅट करणार? पण झोपलो तर मग लिहिणार कधी? आणि लिहायचं तरी काय? एवढी निरनिराळी पुस्तकं वाचून आणि चित्रविचित्र पिक्चर्स बघूनसुद्धा लिहायला काहीच का सुचत नाही? आयुष्यात काही वेगळं घडत नाही म्हणून का? पण मग वेगळं म्हणजे काय? सदासर्वदा असंतुष्ट कस्टमरची नवीन मागणी म्हणजे वेगळं का? प्रोजेक्टमधला नवीन बग म्हणजे वेगळं का? वेगळा प्रोजेक्ट म्हणजे वेगळं का? वेगळी कंपनी म्हणजे वेगळं का? ऒफिसमध्ये दिसणाऱ्या नवीन पोरी म्हणजे वेगळं का? वेगळ्या विषयाचं अथवा कथेचं पुस्तक, नाटक किंवा चित्रपट म्हणजे वेगळं का? रोज रस्त्यावर वाढणारं ट्रॅफिक म्हणजे वेगळं का? का वेगळेपणाची संवेदनाच बोथट झाली आहे? बधिर झाली आहे? पण मग वेगळं म्हणजे तरी काय? जे तुम्ही आधी कधी अनुभवलं नाही ते म्हणजे नवीन अनुभव म्हणजे वेगळं का? पण मग नवीन अनुभव म्हणजे काय? जे तुमच्या पंचेंद्रियांना आधी कधी जाणवलंच नाही ते म्हणजे नवीन का? की त्या इंद्रियांच्या माध्यमातून तुमचा मेंदू ठरवतो ते म्हणजे नवीन? पण मग मेंदू याबाबतीत अतिशहाणपणा करत नसेल कशावरून? ओव्हरकॊंफिडंटली वागत नसेल कशावरून? पण मग लिहायची वगैरे प्रतिभाशक्ती आभाळातून पडते का? खुपजण म्हणतात तशी ती देवाचा प्रसाद असते का? आणि मग तो प्रसाद आपल्यालाच मिळाला आहे हे कसं समजणारं? काहीजण आपण लिहू किंवा बनवू ते छापतील किंवा विकतील म्हणून? की काहीजण त्याला चांगलं म्हणतील म्हणून? पण मग आज वाईट ठरवलेलं उद्या चांगलं वाटायला लागलं तर? म्हणजे चांगलं वाईट असं काही नसतंच तर मग कुणाला देवाचा प्रसाद मिळालाय आणि किती मिळालाय ते कसं ठरवणार? पण मग अशा बऱ्याच प्रतिभावंतांनीच देवाचं अस्तित्वच का नाकारावं?
मला एवढे प्रश्न का पडतात? हा काय प्रश्न झाला? आता माणसाला बुद्धी आहे म्हणूनच तर प्रश्न पडतात की नाही? पण मग मलाच का एवढे प्रश्न पडतात? मला जास्त बुद्धी आहे म्हणून? माझ्या शैक्षणिक पात्रतेकडं आणि नोकरी व पगाराकडं बघून कुणी असं म्हणेल का? पण मग माझ्यापेक्षा हुशार लोकांनापण किंवा इतर बाकीच्यांना प्रश्न का नाहीत पडत? मलाच का पडतात? मी असा एकटा आहे म्हणून? पण मग ऒफिसमध्ये, बाहेर एवढ्या लोकांमध्ये मी असतो मग मी एकटा कसा? ऒफिसनंतरसुद्धा फोनवर, नेटवर लोकांच्या संपर्कात असतोच मग मी एकटा कसा? फक्त लग्न झालं नाही म्हणून एकटा? कुणाबरोबर राहत नाही म्हणून एकटा? तसं नसेल तर मग एकटेपणा म्हणजे काय? तो का येतो? मुळात तो असतोच का येतो? आणि तो असतो किंवा येतो तो कशामुळे? आणि तुम्ही स्वतःला कशाततरी गुंतवून घेतल्यावर तो कमी होतो का? मी खूप विचार करतो म्हणून येतो का एकटेपणा? पण मग बुद्धी आहे म्हटल्यावर विचार येणारच की नाही? का मी अती विचार करतो? आता बरेचजण म्हणतात देखिल मी अती विचार करतो म्हणून, पण मग अती म्हणजे किती? योग्य विचार म्हणजे किती विचार? कसे मोजणार हे विचार? आणि असं आयक्यू किंवा इक्यू सारखं मोजमाप असतं का विचारांचं? मोजणं शक्य झालं तरी जर आयक्युसारखं विचारांचं प्रमाण कमीजास्त करता येणारं नसेल तर काय? मग या विचारांचं आणि पर्यायानं प्रश्नांचं काय करायचं? मुळात त्यांचं काही करता येणार आहे का?
आता हे सगळं लिहून टाकलं तर कुणी वाचेल का?

Subscribe to:
Posts (Atom)