Thursday, April 19, 2007

भाऊ पाध्यांची "अनिरुद्ध धोपेश्वरकर"..

खुपच वेगळा आणि अवघड विषय आहे ह्या कादंबरीचा. "अनिरुद्ध"च्या मनातली "अनावश्यकतेची" भावना आजच्या संगणक युगात खुप जणांना अतिशय तिव्रतेने जाणवत असेल. त्या पार्श्वभुमीवर ह्या कादंबरीतील घटना आणि कथानकाचा प्रवाह नक्कीच विचार करायला लावणारा आहे. प्रथमपुरुषी निवेदनाद्वारे ज्या साधेपणाने ही कथा मांडली आहे तेही उल्लेखनीय आहे. कथानक स्पष्ट करण्यासाठी पुस्तकाच्या मलपृष्ठावरचाच भाग मी येथे देतो (आभार: पॊप्युलर प्रकाशन):
"अनिरुद्ध धोपेश्वरकर नावाच्या एका बॅरिस्टरची ही गोष्ट. अंतर्मन, भावना वगैरे गोष्टींचा फारसा रोमॅंटिक घोळ न घालणाऱ्या ह्या माणसाला आपल्या अनावश्यकतेची जाणीव होते. तोपर्यंत अंगाखांद्यावर लग्नाची, बॅरिस्टरकीची, मैत्रीची अशी अनेक गुंतागुंतीची वस्त्रे चढलेली असतात. आपली प्रतिष्ठा, इभ्रत, आपल्याविषयी लोकांचे चांगले समज तयार करायला खपूनखपून जगणे, वेश्येच्या शरीराप्रमाणे आपल्या भावनांकडे येणाऱ्याजाणाराचे लक्ष ओढणे, पांढरपेशे संबंध टिकविण्याकरता चारचौघांत जाणे - ह्या सगळ्या गोष्टींच्या भंपकपणाने तो हळूहळू मोकळा व्हायला लागतो. त्याच वेळी काहीही करावे पण कुणाचे फारसे वाईट करु नये अशा वागण्याने तो दोन मुलींच्या लफड्यात सापडतो. आपण निरपराध असतानाही तो आपल्यावर घेतलेले आळ अमान्य करत नाही - अन असा बाहेरच्या गुंत्यात तो जसजसा अडकत जातो तसतसा आतून त्यापासून मोकळा होत जातो. "

Tuesday, April 17, 2007

पंकज कुरुलकरांची "जंगल"..

पंकज कुरुलकरांची "जंगल" कादंबरी कालच वाचुन संपली. लेखक-उद्योजक राघव, त्याची बायको सुनिता आणि त्याची सेक्रेटरी मैथिली या तिघांमधील परस्परसंबंधाची हि कथा. लेखकाने या संबंधामधील लैंगिक गुंतागुंत बेधडकपणे मांडली आहे. तिघांच्या प्रथमपुरुषी निवेदनातुन पुढे सरकत लेखकाने तिघांच्या मानसिक प्रवासाचाही धांडोळा घेतला आहे. कथानक तसं काही नविन नाही. नेहमीचीच "पती, पत्नी और वोह" ह्या धाटणीचे आहे. पण नव्या युगाच्या अनुषंगाने ते चांगले फुलवले आहे. स्री-पुरूष संबंधाच्या विषयाला इतक्या थेटपणे भिडणारी ही कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. आता कुरुलकरांच्या इतर लिखाणाबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे.