Friday, September 20, 2013

जोगवा, अंधश्रद्धा, दाभोळकर आणि निर्धार परीषद

काल बऱ्याच दिवसांनी जोगवा पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. उपेंद्र लिमये खरचं तो भुमिका जगलायं असं वाटलं. मुक्ता आजची आघाडीची अभिनेत्री का आहे  हेही प्रकर्षाने जाणवलं. चित्रपटाला तीन साहित्यकृतींची सशक्त पार्श्र्वभूमी लाभल्यामुळे कथा आणि संवाद प्रभावी झाले आहेत. चित्रीकरण, संगीत आणि सहकलाकारांचे अभिनय तितकेच उजवे. पण दुसर्या बाजुला लांबी आटोपशीर असल्यामुळे मात्र काही ठिकाणी प्रसंग पटापट उरकल्यासारखे वाटतात आणि सगळ्यांच्या साड्या जरा मळवुन वापरल्या असत्या तर अजुन वास्तववादी फिल आला असता.

राजन गवस सरांचं चित्रपटातील अल्पसं दर्शन सुखावह आणि त्यांच्या याविषयीच्या भूमिकेला न्याय देणारं वाटलं.

जोगवाचा शेवट मात्र काहीसा झटपट गुंडाळल्यासारखा वाटला. जोगत्याच्या पुनर्विवाहासारख्या तत्कालिन समाज-विरोधासाठी प्रत्यक्षात भोगावे लागणारे परीणाम दाखवले असते तर अंधश्रद्धेचा जनमानसावरचा पगडा अजुन अधोरेखित करता आला असता.

सध्या कदाचित देवदासी आणि जोगतिणींचा प्रश्र्न तितका भयानक राहीला नसावा. पण वेगवेगळ्या मार्गाने अंधश्रद्धा समाजात पुन्हा डोके वर काढताहेत असं वाटतयं. त्यांचं स्वरुप जोगवासारख्या कर्मकांडांइतकं भयानक राहीलं नसेल कदाचित. पण ग्रह-तारे, नशीब आणि गुरु-साधु-बुवांचा वाढता प्रभाव, जातपंचायतींची दहशत, उत्सवांच्या दरम्यान वर्गणी, प्रदुषण, कोंडी यांमुळे वेठीस धरले जाणे इत्यादी प्रकारांनी व्यक्ती किंवा समाजाचं होणारं शोषण थांबलं आहे असं वाटत नाही.
याच पार्श्र्वभूमीवर कोल्हापूरात ऐन गणपतीच्या दिवसात पार पडलेली निर्धार परीषद आठवली. एन. डी. पाटील, कॉम्रेड पानसरे आणि निखिल वागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड समुदायाने एकत्र येऊन दाभोळकरांच्या हत्त्येचा निषेध नोंदवला. गंमत म्हणजे कोणत्याच प्रमुख वर्तमानपत्रांना ही महत्त्वाची बातमी वाटली नाही. नको-नको त्या पुरस्कार सोहळ्यांचे फोटो छापुन येतात पण असल्या समाजोपयोगी कार्यक्रमाची दखल माध्यमांनी घेतली नाही हे पाहुन वाईट वाटले.
एन. डी. सरांनी नमुद केल्याप्रमाणे सगळ्याच समाजाने अंतर्मुख होऊन आपले आचार-विचार बदलण्याची गरज आहे. समग्रपणे वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे एकवेळ अवघड असेल कदाचित पण कर्तृत्त्वावर विश्र्वास ठेवणे आणि आपल्या श्रद्धां इतरांवर न लादता इतरांच्या मताचा आदर करणे हे तर सहज शक्य आहे. म्हणुनच दाभोळकरांसारख्यांचा लढा हा कोणत्याही श्रद्धेविरुद्ध नसुन शोषणाविरुद्ध आहे हे त्यांच्या साहित्याच्या वाचनातुन प्रकर्षाने जाणवलं.

मला नेहमी प्रश्न पडायचा कि माझ्यासारखे कोणत्याही चळवळीत किंवा समाजकार्यात भाग न घेणारे लोक याबाबतीत काय करु शकतील? मी याकामी काय योगदान देऊ शकेन? आता काही विचारांती असं जाणवतं की:
  • आपण शोषणाच्या विरोधी भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या श्रद्धा आचरणात आणताना घरातले बाहेरचे कोणालाही त्रास होता कामा नये किंवा इतरांमुळे असा त्रास होत असेल ठामपणे निषेध नोंदवला पाहिजे.  
  •  नशीबापेक्षा कर्तृत्वाने मिळालेल्या यशाला अधिक गौरवलं पाहिजे. समाजाचा कर्तृत्वावरचा विश्वास वाढेल तेव्हाच या अंधश्रद्धेच्या कुबड्या गळुन पडतील.

No comments: