प्रसंग इवलासा पण माझ्या सुटी-सुख-आधीन मनाच्या डोहात डुबुक झालं म्हणुन ह्या
शेअर करण्यासारख्या चार ओळी.
आज माझ्या मुलासाठी - तीन वर्षांच्या विराजसाठी त्याच्या आत्त्याने धनुष्यबाण
आणला. झोपेपर्यंत त्याने तो धनुष्य काही हातातुन खाली ठेवला नाही. झोपवायच्या वेळी
बायकोने कष्टाने धनुष्यबाण दूर केला आणि नेहमीप्रमाणे विराजने स्टोरीची फर्माईश
केली. बायकोने नेमकी एकलव्याची स्टोरी सांगायला सुरुवात केली. गुरुदक्षिणेच्या
प्रसंगापर्यंत आल्यावर बायकोने मला प्रश्न केला, आता त्याला कसं सांगायचं रे. मी
लॅपटॉपमधुन डोक वर काढुन म्हटलं, सांग की, जे आहे ते सांगायचं. तसंही त्याला आता
काही कळणार नाही.
मग मला नेहमीप्रमाणे प्रश्न पडायला लागले. बायकोला हीच स्टोरी सांगावी असं का
वाटलं असेल? आणि त्यानंतर
ती गुरुदक्षिणेच्या सीनला का अडखळली असेल?
मग माझी विचारांची टकळी सुरु झाली. एकलव्यच का. धनुष्यबाण वापरणारे अर्जुन,
राम असे मोठे योद्धे असताना एकलव्यच का. तिला विचारल्यावर ती म्हणाली, “माहीत नाही. काही सांगता येत नाही.
आणि मी जाणुनबुजुन केलं असही नाही. आणि तु फार किस पाडत बसु नको.”
तरीपण मी असा निष्कर्ष काढला कि मराठी उच्च मध्यमवर्गीयांना एकलव्य जास्त
लक्षात राहतो तो कदाचित त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे. म्हणजे या वर्गाला
अन्यायाची चिड आहे हे नक्की. तो दूर करण्यासाठी हा वर्ग काय योगदान देतो हा विषय
वेगळाच आहे.
त्यानंतर बायको गुरुदक्षिणेच्या सीनला का अडखळली. कदाचित तिला वाटलं असेल की
आपल्या मुलाला आत्ताच अन्यायासारख्या (भिषण?) प्रकारांची
ओळख करुन द्यायला नको. म्हणजे “जगात सगळे लोक
नेहमी न्यायानेच वागतात” हे रम्य
चित्र या रम्य बालपणाततरी त्याच्या कोवळया मनावर उमटु दे. फेअर ईनफ. एका आईची अशी
अपेक्षा रास्त आहे.
शेवटी हा एकलव्य कुठुन आला. तर महाभारतातुन. आपला एक महत्त्वाचा सांस्कृतिक
वारसा. रा. वा. शेवडेगुरुजी नावाचे एक लेखक म्हणाले होते - रामायण हे आदर्श जीवन
कसं असावं हे सांगत तर महाभारत हे वास्तव जीवन कसं असतं ते (शब्द हेच आणि त्यांचेच
का याबद्दल चु.भु.दे.घे.). त्याअर्थाने महाभारतातल ते वास्तव जीवन अजुन बदललयं
(किमान एकलव्याच्या कथेपुरतं तरी) असं वाटत नाही. म्हणुन व्यासमुनी ग्रेट.
No comments:
Post a Comment