Friday, November 8, 2013

नेमाडेंची “हिंदु – एक समृद्ध अडगळ”

वाचनाचा बॅकलॉग ही माझ्यासारख्या वाचनप्रेमीसाठी खुप लाजीरवाणी गोष्ट. मी पुस्तक घेऊन तीन वर्षांनंतर नेमाडेंची हिंदु वाचण्याचा दुग्धशर्करा का काय म्हणतात तो योग आला. आणि त्यासाठीसुद्धा मटामधला २७ ऑक्टोबरचा डॉ दिवाणांचा लेख आणि राजन गवससरांच्या एका भाषणातला हिंदुचा उल्लेख अशी योगायोग-आज्ञा घडुन तमाम हिंदुंचा आनंदोत्सव असलेल्या दिवाळसणात हिंदु-वाचनाचा मुहुर्त उजाडला. पण म्हटलं तीस वर्ष खपुन लिहीलेल्या कादंबरीचे आपल्याकडुन तीन वर्षांनंतर का होईना वाचनाचे सत्कार्य घडते आहे हेही नसे थोडके.

मराठी साहित्यात नेमाडे हे फक्त प्रसिद्ध, वाद()ग्रस्त नावच नाही तर लेखक-वाचकांचा एक पंथ आहे. (स्वतः नेमाडेसर हे मान्य करतात.) आता पंथ म्हटल्यावर अनुयायी आणि विरोधक आलेच. आणि या नेमाडपंथीयांच्या बाबतीत तर दोन्ही गट तीव्र भावनावाले.

माझ्यापुरतं सांगायच झाल्यास, मला नेमाडेंच्या कादंबरीचे वाचन म्हणजे नेहमीच एक रोमांचकारी, मनोरंजक अनुभव वाटला. तितकाच आशयगर्भ आणि अस्सल. नोकरीला लागल्यावर केव्हातरी कोसला हाती लागल्यानंतर बिढार-चातुष्ट्य संपेपर्यंत सगळं वाचुन झाल्यावर त्यांनी अजुन का लिहीलं नाही असं सारख वाटत राहीलं. मधे केव्हातरी कळालं की हिंदुचं लिखाण चालुच आहे.

सो बॅक टु हिंदु. खंडेराव नावाच्या खानदेशी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि पेशाने पुरातत्त्वसंशोधक असलेल्या नायकाच्या माध्यमातुन नेमाडेसर हिंदु जीवनपद्धतीची नव्याने व्यापक आणि समग्र मांडणी करु पाहताहेत. इथे फक्त नायकाचे आयुष्यच नव्हे तर मोहेंजदाडो संस्कृतीपासुन, नायकांच्या पूर्वजांपासुन ते गोतावळ्यातील खुप साऱ्या व्यक्तिंच्या आयुष्यातील घटना, संदर्भ, संवाद सहेतुक म्हणा निर्हेतुक म्हणा अशा पद्धतीने दाटीवाटीने पसरल्या आहेत. शेतकऱ्याच्या घरातल्या अडगळीचे रुपक अख्या कादंबरीभर मांडणीमधे, विचारांमधे वगैरे वगैरे आपल्याला परत परत भेटत राहते.

कादंबरीमधे केलेल्या टिका, भाष्ये वगैरेंवर खुप साऱ्या चर्चा नेमाडपंथी अनुयायी आणि विरोधकांच्यात याअगोदरच झालेल्या आहेत त्यामधे मी माझ्या अल्पशा साहित्य-इतिहासादी-ज्ञानाने भर टाकु शकणार नाही. पण कादंबरी वेड्यासारखीवाचुन संपल्यावर माझ्या हिंदुसंस्कारीत मनात जी काही खळबळ उडाली ती शब्दबद्ध करुन शांतता मिळवण्याचा हा प्रयत्न.

आपण हिंदु असण्याचा अर्थ फक्त देवदिकांच्या पुजाअर्चा, सणसमारंभ, चालीरीती, रुढीपरंपरा इतकाच नसतो तर कुटुंबव्यवस्था, गोतावळा, स्त्रीयांची फरपट, त्यांचं संस्कृतितलं स्थान, सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक-नागरी व्यवस्था त्यातला भ्रष्टाचारादी संस्कार असा सगळा परीघपण त्यात येतो. त्यातच एकाबाजुला आपल्यासाठी जीव टाकणारी, नुसत्या आठवणीनेसुद्धा व्याकुळ करणारी गोतावळ्यातली माणसं, बायकांची ओली माया, तर दुसऱ्या बाजुला हेवेदावे, प्रतिष्ठेच्या कल्पना हेपण आहे.कितीही व्यक्तीकेंद्री जगत असलो तरी या पिढीपर्यंतच्या आपल्या बहुतेकांना हा परीघ स्वतःवेगळा करता येणार नाही. कादंबरी वाचताना हि जाणीव गडद होते.

आपल्या पिढीजात परंपरेतुन, गावपांढरीच्या-प्रदेशाच्या इतिहासातुन, पुरातत्त्वातुन जाणिवांचा मागोवा घेउ इच्छीणारा नायक मला जवळचा वाटला. आपण एवढे कोरडे, कृतघ्न होण्यामागे, नात्यांमधला ओलावा संपण्यामागे संस्कृतिचं शहरी-नागरी होत जाणं हे आहे का, नागरी-शहरी होत जाणारी संस्कृती स्वतःचा नाश ओढवुन घेत असते का,अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा कथेच्या ओघात घेतला आहे.

सिंधु संस्कृती, बुद्ध, महानुभाव-वारकरी पंथ, होळकर-पेंढारी-ब्रिटीश आक्रमणं, स्वातंत्र्य, फाळणी, गांधीहत्या, आंबेडकरी नवबौद्ध क्रांती, हरीत क्रांती अशा सगळ्या ऐतिहासिक सांस्कृतिक घडामोडींचा परामर्श नायकाच्या गावावर आणि आजुबाजुच्या लोकांवर होणाऱ्या परीणामाच्या निमित्ताने घेतला आहे. यातल्या बऱ्याच गोष्टींची माहिती नव्हती. त्या घटनांची ऐतिहासिक अचुकता हा भाग थोडावेळ बाजुला ठेवला तरी त्याचा कादंबरीत मांडलेला ग्रामीण जीवनावरचा परीणाम हा बरचं काही शिकवुन जातो. अनेक रुढीपरंपरांची मुळं समजुन घ्यायला मदत करतो.

लहानपणी मला घरातले दुर्लक्षित (किंवा अनटच्ड) कोपरे ढुंढाळायची सवय होती. अडगळीतल्या वस्तु, पुस्तकं कोणाची, का व कधी असे प्रश्न विचारणं हा नकळत माझ्या कौटुंबिक जाणिवा आणि सामान्यज्ञान वाढवण्याचा समृद्ध अनुभव व्हायचा. त्याप्रमाणेचहिंदु – जगण्याची समृद्ध अडगळवाचणे हा माझं मराठी हिंदुत्व वेगळ्या दृष्टीकोणातुन समजुन घेण्याचा अनुभव ठरला.

आता हिंदु-सिरीजमधल्या उर्वरीत तीन कादंबऱ्यांची उत्कंठावर्धक प्रतिक्षा आहे. काहीतरी वेगळं वाचायला मिळणार हे नक्की.

No comments: