Wednesday, May 2, 2007

गो. नी. दाण्डेकरांच्या "कहाणीमागची कहाणी"

"कहाणीमागची कहाणी" या पुस्तकांत गो. नी. दाण्डेकरांनी (गोनीदा) आपल्या लेखनाबद्दल, निर्मितीप्रक्रियेबद्दल वेळोवेळी लिहीलेले लेख आहेत. तसेच त्यांनी वाचकांच्या पत्रानां दिलेली उत्तरे व त्यांची "मॅजेस्टीक गप्पा" या कार्यक्रमांतर्गत घेतलेली मुलाखत या पुस्तकामधे आहे.
गोनीदांच पहिलं पुस्तक कोणतं वाचलं ते आता आठवत नाही (कदाचित "माचीवरला बुधा" किंवा "जैत रे जैत" असावं.) तेव्हापासुन गोनीदा आवडते लेखक झाले. भोवतालच्या निसर्गाचे सहज आणि सोपे वर्णन करीत वाचकाला गोष्ट सांगण्याची त्यांची शैली पहिल्यापासून आवडली. त्यावेळी लागोपाठ त्यांच्या "माचीवरला बुधा", "जैत रे जैत", "मृण्मयी", "शितु", "स्मरणगाथा" व अगदी अलिकडे "रानभुली" या पुस्तकांचे वाचन झाले.
गोनीदांचा संत साहित्याचा प्रदीर्घ अभ्यास, संत गाडगेबाबांचा सहवास, नर्मदा परिक्रमा इत्यादींनी परिपुर्ण असलेले विलक्षण जीवन यामुळे गोनीदांच्या लिखाणाला एक अध्यात्मिक खोली प्राप्त झाली आहे. याचा पुरेपुर अनुभव "मृण्मयी", "माचीवरला बुधा" वाचताना येतो. मानवी संबंधाबद्दलची एक प्रगल्भ जाणीव त्यांच्या पात्रांमधुन उठुन दिसते.
तसेच निसर्गावरील अनुभवसिद्ध प्रेमामुळे त्यांच्या कादंबऱ्यामध्ये डोकावणारा निसर्ग नुसताच पार्श्वभुमीपुरता मर्यादित न राहता तो कादंबरीतील पात्राचीही भुमिका निभावतो. "अनुभवसिद्ध" अशासाठी म्हटले कारण गोनीदांनी आपल्या कादंबऱ्यामधील वातावरण हुबेहुब यावे यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वास्तव्य केले व पात्रांचे राहणे स्वत: जगुन मग लिहीले.
तर गोनीदांच्या लेखनातील या व यासारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांची चिकित्सा "कहाणीमागची कहाणी" मधे आहे आणि हे सर्व त्यांच्याच शब्दांत वाचल्यामुळे त्यांची पुस्तके पुन्हा वाचण्याची इच्छा झाली आहे हे निश्चितचं. Visit blogadda.com to discover Indian blogs

1 comment:

Vidya Bhutkar said...

Hi Vikram, your posts are really informative. I do not have access to marathi books right now, but I am glad that I am atleast aware or reminded of many good books. Thanks. Keep writing.
-Vidya.