Wednesday, December 5, 2007

वैताग

ऑफिसला जाताना एवढा वैताग त्याला कधीच वाटला नव्हता. नोकरी सोडुन घरची उत्तम शेती करायची रोमँटीक कल्पना त्याच्या डोक्यात असंख्य वेळा चमकुन गेली होती. पण पेपरातल्या आत्महत्त्यांबद्दल वाचुन वडलांनी आणि यंदा मुलाचे कर्तव्य आहे असा झेंडा (त्याच्या पगारपत्रकासहित) मिरवणाऱ्या आईने त्याच्या कल्पनेला डोक्याबाहेर पडु दिले नव्हते. त्यामुळे वैताग वेगवेगळ्या स्वरुपात वाढतचं होता. पण आता सगळ्याच गोष्टींचा कडेलोट होतोय असं त्याला गेले काही दिवस मुद्दामचं वाटत होतं. पण आजचा दिवस जणु आपल्यावर सूडच उगवायला उगवलाय अशी खात्रीच त्याला ऑफिसमध्ये पाउल टाकल्यापासुन झाली. आपण जागी पोहोचायच्या आधीच जर आपला बॉस आपल्या क्युबिकलमधे आपली वाट पाहत उभा असेल तर त्यासारखा मोठा अपशकुन कोणता आख्या जगात नसेल. आता चार वाजेपर्यंत काही फॉर्वर्ड्स वाचता येणार नव्हते, चॅटिंग तर लांबची गोष्ट. आता मेलबॉक्स चार दिवस मुक्ती न मिळालेल्या महानगरपालिकेच्या कचरा कंटेनरसारखा भरुन वाहणार होता. कंटेनरची आठवण होताच नाकात वास भरुन त्याचा चेहरा वाकडा झाला. नेमकी त्याची तीच भावमुद्रा टिपुन बॉसनं निदान हजारवेळा मारलेला हँगओवरचा पकावु पीजे परत मारला आणि स्वत:च आपल्या पीजेवर खुश होत ख्या ख्या करुन हासला. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या अप्रायझलची आठवण करुन त्यानं मन मारुन स्माइल केलं आणि गुडमॉर्निंग म्हटलं. ढिगभर कामाची जंत्री त्याच्या गळ्यात मारुन एक तासानी बॉस त्याच्या क्युबिकलबाहेर पडला तेव्हा त्याला आपल्या क्युबिकलवर मोठा काळा ढग बरसायच्या कमांडची वाट बघत थांबलाय असं वाटलं. काले मेघा काले मेघा पानी तो बरसा म्हणत आचकट विचकट नाचणारे लगानमधले आमिरचे सगळे गावकरी बॉसचे नातेवाइक असल्याची फालतु कल्पना त्याच्या मनात उगीचच तरळली. दुपारी टिफीन डेस्कवर यायच्या दोन मिनिटं आधी बॉस लंचनंतरच्या मिटींगची दवंडी पिटुन गेला आणि त्याचं जेवण पार अळणी होवुन गेलं. मिटींगमधे नकट्या कुरुप पोरीचा बाप असल्यासारखा बॉस कस्टमरच्या सर्व मागण्या मान्य करतचं चालला होता. टिचभर क्युबिकलमधे आणि वितभर ऑफिसमधे जन्मठेपेच्या कैद्यासारखं पिझाचे तुकडे चावत काढाव्या लागणाऱ्या पुढच्या असंख्य संध्याकाळी आणि रात्री त्याच्या नजरेसमोर तरंगल्या. मिटींगनंतरच्या इंटर्नल डिस्कशनमधे शेड्युलवर बॉसबरोबर तासभर वाद घालुन त्याचं डोकं पिकुन गेलं होतं. संध्याकाळी टिमबरोबर चहा घ्यायला टपरीवर आला तेव्हा गप्पांची सुरुवात होम लोन या त्याच्या नावडत्या विषयानेच सुरु झाली. मग कुठं बुक केला फ्लॅट असं दोघातिघांनी विचारल्यावर त्याला गावाकडं आई वडलांचं घर असुनसुद्धा उगीचचं बेघर वाटायला लागलं. चहाबरोबरच्या गप्पांचा शेवट अपेक्षित पण वैतागवाणा असा शेअर मार्केटने झाल्यामुळे त्याला आपण रेसकोर्सच्याबाहेर बसुन चणे विकणाऱ्याच्या लायकीचेच असल्यासारखं वाटलं.

संध्याकाळी ऑफिसमधला मुक्काम दहा तासापेक्षा जास्त लांबल्यानंतर आणि खिडकीतुन काळोख डोकावु लागल्यानंतर त्याचा मोबाइल वाजला तेव्हा अंमळ आश्चर्याने त्याने नंबर बघितला. नंबर ओळखीचा तर नव्हताच पण घड्याळाकडं एक नजर टाकुन हा फोन कुठल्या बँकवाल्या अक्काबायचा असणार नाही याची मनोमन खात्री करुन, एस टी डी कोड कुठला असेल असा विचार करत त्याने फोन उचलला. पलिकडचा पुरुषी आवाज अगदी परिचित नाही पण एखाद्या खोल तळाच्या पिशवीत चाचपताना वस्तु हाताला लागावी पण ती काय आहे हे कळु नये असा वाटत होता. खुप वेळ फिरकी घेवुन पलिकडच्या आवाजाने ओळख करुन दिली तेव्हा कचकुन एक शिवी त्याच्या तोंडुन बाहेर पडली आणि त्याचा आवाज उगीचच मोठा आणि मोकळा झाला. गावच्या कट्ट्यावर ऐसपैस बसावं तसा तो टेबलावरचं फतकलं मारुन बसला. काही मिनिटातचं मनाने तो त्या फोनवरच्या आर्मीतल्या मित्रांच्या सीमेवरच्या कुठल्याशा निर्जन पोस्टवरच्या बराकीत जावुन पोचला. त्याचं क्युबिकल आणि मित्रांची बराक एक तासाभरासाठी शेजारी शेजारी असल्यासारखचं वाटत होतं त्याला. इकडं हा ऑफिसमधे एकटा आणि तिकडं ति पोस्टवर एकटे. तिकडं पडणारा हिमवर्षाव आणि थंड बोचरा वारा स्वत: अनुभवत असल्यासारखं तो अंग चोरुन बसला. मित्र सुटीसाठी गावी येतायेत हे ऐकुन त्याला बऱ्याच दिवसांनी गावी जायची ओढ लागली. मित्रांच्या सुटीच्या तारखांची मनात उजळणी करत त्यानं फोन ठेवला तेव्हा त्याला जरा बरं वाटु लागलं. पँट्रीत जावुन ताजमहालच्या पिशव्या टाकुन बनवलेला चहा मायक्रोवेव्हमधे जरा जास्तच उकळुन त्याने एक घुटका घेतला. दुपारी बॉसबरोबरच्या भांडणानंतर आखलेल्या प्रोजेक्टच्या पसरट वेळापत्रकावर नजर टाकुन त्याने मित्रांच्या सुटीशी जुळणाऱ्या तारखा टिपुन एक रजेचा अर्ज भरला. तो अर्ज बॉसला (तारखांच्या स्पष्टीकरणासहीत) मेल करुन तो निघाला तेव्हा ऑफिसबाहेर पडताना एवढे प्रसन्न त्याला कधीच वाटले नव्हते.

2 comments:

Unknown said...

Vikram,
Khup chan lihile aahes. Keep it up..

Parag said...

Nice one..
Keep writing.. :)